विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी स्वराज्य संघटनेचा पुढाकार
संगमनेर शहर : पेमगिरी निमगाव मार्गे संगमनेर येथे येणारी बस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने स्वराज्य संघटनेचे जिल्हा निमंत्रक आशिष कानवडे यांनी या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊन संगमनेर बसस्थानक आगार प्रमुख चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
सदर वृत्त असे की, पेमगिरी, निमगाव, धांदरफळ, खांडगाव मार्गे सकाळी ६:१५ वाजता जाणार्या बसला पाऊण तास उशिरा होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचण्यासाठी उशीर होत होता. सदर बस अनेक वर्षांपासून पेमगिरी येथे मुक्कामी असायची व सकाळी विद्यार्थ्यांना वेळेत ने आण करत होती.
मात्र काही दिवसांपासून बस शिरसगाव येथे मुक्कामी जाऊ लागल्याने पेमगिरी निमगाव मार्गे संगमनेर येथे उशिरा येऊ लागली. परिणामी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यास उशीर होऊ लागल्याने शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे स्वराज्य संघटनेच्या वतीने जिल्हा निमंत्रक आशिष कानवडे यांच्या नेतृत्वात संगमनेर बसस्थानक आगार प्रमुख चव्हाण यांना विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वराज्यचे तालुका निमंत्रक संदिप राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुधीर शिंदे, शिवसेनेचे संकेत कोल्हे यांच्यासह सदर मार्गे प्रवास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.