ठळक बातम्या
दिव्यांग मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य; अखेर बच्चुभाऊ कडु यांच्या प्रयत्नांना यश- सुरेशराव लांबे पाटील
राहुरी – दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी, दिव्यांग व सर्वसामान्याचे दैवत असलेले आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर असेच ठोस निर्णय घ्यावेत, असे मत प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना श्री लांबे म्हणाले की, भविष्यात आ.बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या बरोबर कष्ठकरी शेतकरी, सर्व सामान्य नागरीक व दिव्यांग बांधव खंबीरपणे राहिल्यास आ.बच्चुभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील व त्याच वेळेस शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना खरा न्याय भेटेल. महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येणार आहे.
तसेच अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होईल, एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरणार, दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार, खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांग योग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वस्तीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे.
ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल तिथे शौचालय मिळणार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्ताव सादर केल्याची माहिती स्वतः आ.बच्चुभाऊ कडू यांनी दिली. या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी दिव्यांग बंधु भगिनी कडून होत आहे. लढा कसा लढावा व यशस्वी कसा करावा हे प्रत्येकाने लोकनायक आ बच्चुभाऊ यांच्या कडुन शिकावे असेही सुरेशराव लांबे म्हणाले. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याने सुरेशराव लांबे पाटील यांनी शिंदे -फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.