कृषी
सुवर्ण भविष्यासाठी शाश्वत मृद व्यवस्थापन गरजेचे – महासंचालक डॉ. हिमांशू पाठक
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्थेचे 86 वे वार्षिक अधिवेशन सुरू
राहुरी विद्यापीठ : जमिनीच्या आरोग्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. जर जमीन व्यवस्थीत असेल तर आपले आरोग्य चांगले असेल. आपल्या सुवर्ण भविष्यासाठी शाश्वत मृद व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीच्या भारत सरकारचे कृषि संशोधन आणि विस्तार विभागाचे सचिव तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय मृद विज्ञान संस्थेचे 86 वे वार्षिक अधिवेशन दि. 15 ते 18 नोव्हेंबर, 2022 दरम्यान, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन मार्गदर्शनात डॉ. हिमांशू पाठक बोलत होते. याप्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नवी दिल्ली येथील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते.
यावेळी नवी दिल्ली येथील भारतीय मृदा विज्ञान सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी.आर. बिश्वास, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, धारवाड कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.एल. पाटील, नवी दिल्ली येथील भारतीय मृदा विज्ञान सोसायटीचे सचिव डॉ. के.के. बंडोपाध्याय, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे व भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे राहुरी चाप्टरचे अध्यक्ष व संयोजन सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. हिमांशू पाठक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की मृदविज्ञान संस्थेने स्थापनेपासून आत्तापर्यंत खुप चांगले काम केले आहे. मृद विज्ञान संस्थेने विकसीत केलेले संशोधन, काढलेले निष्कर्ष हे सरकारच्या खत विषयक धोरणे ठरविण्याकामी मदत करणारे ठरतील. यासाठी जमीन आरोग्य पत्रिकांची नितांत गरज आहे असे यावेळी ते ऑनलाईन मार्गदर्शन करतांना म्हणाले. डॉ. एस. के. चौधरी आपल्या भाषणात म्हणाले की आपल्या देशातील शेतीसाठी खत व्यवस्थापन ही मोठी समस्या असून मागच्या वर्षी 15 दशलक्ष टन रासायनिक खतांचा वापर शेतीसाठी करण्यात आला. सरकारच्या डोक्यावर रासायनिक खतांच्या सबसीडीचा जवळ जवळ दोन लाख करोडचा बोजा आहे. आपल्याला शेतीचे रासायनीक खतावरील अवलंबीत्व कमी करावे लागणार आहे. त्यासाठी जैविक खतांचे प्रमाण आवश्यक त्या प्रमाणात वाढवाले लागेल. मृद विज्ञान संस्थेच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून येणारे निष्कर्ष हे सरकारी धोरणे ठरविण्यासाठी उपयोगी पडण्याबरोबरच ते शेतकर्यांनी आत्मसात करणे हे आपल्या समोरील आव्हान असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जमीन ही आपल्याला मातेसमान असून अनेक जीवजंतू बरोबरच आवश्यक सुक्ष्मजीवांचे अस्तित्व तिच्या आरोग्यावर अवलंबून आहे. गेल्या शतकात जमिनीची प्रत फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे. जमीन सुधारण्यासाठी व कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. माती जिवंत कशी राहिल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावेळी त्यांनी पदवी अभ्यासक्रमामध्ये 3500 मातीचे नमुने तपासण्याबरोबरच 3000 पेक्षा जास्त जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप शेतकर्यांना केले आहे, त्याचबरोबर कृषि विद्यापीठाच्या कसबे डिग्रज जि. सांगली येथील 10 हजार एकर क्षेत्रावरील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
यावेळी ईशा फाउंडेशनचे श्री. सद्गुरु हे ऑनलाईन संदेशामध्ये म्हणाले की पृथ्वीवरील सशक्त जीवनासाठी आरोग्यवर्धक माती असणे गरजेचे तसेच नितांत आवश्यक असे आहे. माती सुरक्षीत राहण्यासाठी, तिच्या भरणपोषणासाठी प्रत्येकाने हृदय व मनापासून प्रयत्न करावेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. व्ही.एस. तोमर, डॉ. एस.एस. मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. जे.ए. सामरा, डॉ. ए.के. सिक्का, डॉ. जे.डी. पाटील, डॉ. ए.एस. पाटील, डॉ. एन.बी. मोरे, डॉ. एन.बी. जाधव, डॉ. ए.एल. देशपांडे, डॉ. अशोक ढगे, डॉ. अरुन भोसले, डॉ. बांगर या मृद विज्ञान संस्थेच्या माजी पदाधिकारी व विद्यापीठाच्या माजी शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. डी.आर. बिश्वास यांनी भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या कार्याबाबत आढावा सादर केला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले. भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या वतीने दिले जाणार्या पुरस्कारांची घोषणा मृद विज्ञान संस्थेचे सचिव डॉ. के.के. बंडोपाध्याय यांनी केली. यामध्ये डॉ. असीमकुमार सरकार, डॉ. जगदिश प्रसाद, डॉ. ए.के. पात्रा, डॉ. के.के. बंडोपाध्याय, डॉ. प्रदिप डे, डॉ. एन.बी. प्रकाश, डॉ. बापुसाहेब भाकरे, डॉ रणजीतसिंग चौधरी, डॉ. धालीवाल, डॉ. पी. बालसुब्रमण्यम व डॉ. निर्मल यांना विविध पुरस्कार व फेलोशिपने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ईशा फाउंडेशनचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशनांचे व फुले स्मार्ट फर्टीलायझर कॅल्युलेटर या मोबाईल ॲपचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसंयोजन सचिव डॉ. रितू ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन आचार्य स्नातक सायली बिरादार हिने केले. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. या अधिवेशनासाठी देशभरातून 350 पेक्षा जास्त मृदा शास्त्रज्ञ व 100 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.