कृषी
जाणून घेऊयात कोण आहेत डिसेंबर महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम गतवर्षी सुरु झालेला आहे. डिसेंबर महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन महादेव जाधव व कृषि उद्योजक म्हणुन लक्ष्मण डोळे यांची निवड झालेली आहे.
महादेव जाधव हे मु. मांघर, पो. तळदेव, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील शेतकरी असून कृषि पदवीधर लक्ष्मण डोळे हे एम.आय.डी.सी. मालेगांव, जि. नाशिक येथील कृषि उद्योजक आहेत. शेतकरी आयडॉल महादेव जाधव यांनी शास्त्रशुध्द पध्दतीने मधमाशीपालन करुन सेंद्रिय मधाचे उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. मधमाशीपालनामुळे शेतीमधील उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ झालेली असून सातेरी मधमाशीपालनातुन मिळणार्या मध, रॉयल जेली, पराग व मेणामुळे उत्पन्नात वाढ झालेली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे त्यांचे मांघर हे गांव मधाचे गांव म्हणून ओळखले जाते.
कृषि उद्योजक लक्ष्मण डोळे यांनी धुळे कृषि महाविद्यालयातुन कृषि शिक्षणाची पदवी घेतलेली आहे. त्यांनी शेतकर्यांच्या उत्कर्षासाठी मल्टिमोल मायक्रोफर्टीलायझर कंपनीची स्थापना सन 1994 मध्ये करुन नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य देवून आधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून सेवा प्रदान केली आहे. तसेच प्रोबायोटीक तंत्रज्ञानावर आधारीत अधिक तीव्रतेचे बायोफर्टीलायझर व बायोपेस्टीसाईडची निर्मिती व बायोफर्टीलायझरचे 100 बिलीयन्स प्रती ग्रॅम स्पोरमध्ये उत्पादन घेत आहेत. त्यांच्या कंपनीद्वारे तयार केलेल्या उत्पादनांची निर्यात देशात तसेच विदेशातही होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येत आहे.