कृषी

प्रहारचा शेतीपंपाच्या पठाणी वीजबिल वसुली विरोधात आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील सुरू असलेल्या महावितरण वीज कंपनीच्या सक्तीच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या पठाणी वीजबिल वसुली विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सुरेशराव लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार फसियोद्यिन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतीपंपाच्या वीजबिल वसुली विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करूनही अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सक्तीने कट करून थकीत वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावित आहे व आम्हाला सक्ती करण्यास वरिष्ठांनीच आदेश आलेले आहेत असे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे. त्यांच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही त्यामुळे महावितरण कंपनीने सक्तीने वीजबिल मोहिम तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्याचे उर्जा राज्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा व जर शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने येत्या २ डिसेंबर २०२१ रोजी नगर-मनमाड राज्य महामार्गावर मार्केट कमिटी समोर सकाळी ११ वाजता तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन व आत्मदहन आंदोलन करण्यात येईल. यांच्या परिणामांची होणारी सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिलं असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर आरपीआयचे नेते बाळासाहेब जाधव, आरपीआय तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे, वंचीत आघाडीचे पिंटू नाना साळवे, अशोक मकासरे, बाळासाहेब मकासरे, ईश्वर आढाव, रवींद्र धुमाळ, बादशाह शेख, बाबुराव मकासरे आदिंसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button