अहिल्यानगर
विहीरीत डोकावत असताना पाय घसरुन पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील कणगर येथिल शेतकरी भारत बाबासाहेब वरघुडे हा सोमवारी सकाळी कांदा पिकास पाणी भरण्यास शेतात गेला असता विहीरीत डोकावत असताना पाय घसरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्या तरुणाला वाचविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंञणेमुळे पोलिस पाटील यांचा संदेश गावातील सर्व ग्रामस्थांना एकाच वेळी मिळाला. मदतीसाठी सर्वच जण धावले. परंतू तरुणाचा मृतदेह विहिरीतील कपारीला अडकल्याने पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना बोलविण्यात आले. त्यांनाही तरुणाचा शोध घेता आला नाही. अखेर गळ टाकून मृतदेह शोधण्यात आला. गळ मृतदेहाच्या कपड्यास गुंतल्याने मृतदेह वर काढण्यात यश आले. ग्राम सुरक्षा यंञणेत सहभागी असणारे पोलिसांना मोबाईलवर संदेश मिळूनही पोलिस घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील कणगर येथिल वरघुडे वस्तीवरील तरुण भारत बाबासाहेब वरघुडे वय 24 हा सकाळी 8 वाजता विहिरीत पडल्याची माहिती पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्राम सुरक्षा यंञणेद्वारे मोबाईल वरुन संदेश पाठविला. हा संदेश गावातील जे ग्रामस्थ ग्राम सुरक्षा यंञणेस जोडलेले आहे. त्यांना तातडीने हि माहिती समजली. गावातील ग्रामस्थांनी त्या तरुणाला वाचविण्यासाठी धाव घेतली. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करुनही मृतदेह सापडला नाही. स्थानिक पट्टीचे पोहणारे ज्ञानदेव बर्डे, अशोक बर्डे, धनंजय बर्डे, अनिल बर्डे यांनी पाण्यात उड्या घेवून त्या तरुणाचा शोध घेतला पण यश आले नाही. नानासाहेब जाधव व शंकर गावडे यांनी गळ टाकून शोध घेतला असता गळाला त्या तरुणाचा मृतदेह लागला.
ग्राम सुरक्षा यंञणेच्या एका संदेशामुळे ग्रामस्थांसह तहसिल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी हजर झाला. पोलिसांना हा संदेश पोहचूनही पोलिस माञ घटनास्थळी आलेच नाही. घटनास्थळी कणगर गावचे सरपंच सर्जेराव घाडगे, बाळासाहेब गाढे, संदिप घाडगे, शिवाजी वरघुडे, राहुल वरघुडे, सुभाष वराळे, सुनिल शेटे, तौसीफ इनामदार, सुयोग नालकर, अनिल घाडगे, अशोक वरघुडे, भारत खाटेकर आदींनी तरुणाला वाचविण्यासाठी मोलाची मदत केली. परंतू दुर्देवाने त्या तरुणाचा मृत्यू झाला.