साहित्य व संस्कृती
डॉ. शिवाजी काळे, संगीता फासाटे, बाबासाहेब चेडे यांना प्रबोधन पुरस्कार प्रदान…!
श्रीरामपूर : खंडाळा येथील अक्षर साहित्य प्रबोधन मंचतर्फे येथील श्रीराम मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीप्रसंगी प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याची माहिती अक्षर साहित्य प्रबोधन मंचचे संस्थापक, अध्यक्ष संतकवी एकनाथ डांगे पाटील यांनी दिली.
श्रीरामपूर भूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वाला श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण मूर्तीचे पूजन करून संतकवी एकनाथ डांगे यांनी आपल्या मंचच्या कार्याची माहिती देऊन स्वागत केले. डॉ.शिवाजी एकनाथ काळे यांच्या ‘गावकुसातल्या गोष्टी ‘या ग्रामीण विनोदी कथासंग्रहास, संगीता चंद्रभान फासाटे,कटारे यांच्या ‘माय जानकी : कवितासंग्रहास साहित्य प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आले तर शिरसगावसारख्या ग्रामीण भागात निरपेक्षपणे, सेवाभावाने पत्रकारिता, फोटोग्राफी करून लोकप्रिय असणारे बाबासाहेब रामकृष्ण चेडे यांना सेवाभावी समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ.शिवाजी काळे म्हणाले, आपल्या कथासंग्रहास मिळालेला पुरस्कार पुढील लेखनाला प्रेरणादायी आहे असे सांगून ‘गाकुसातल्या गोष्टी’महत्व विशद केले. संगीता फासाटे यांनी मनोगतात सांगितले, स्व.गोविंदराव आदिक यांच्या मातोश्री जानकीबाई आदिक यांनी आपल्या परिवाराला संस्कार आणि परिश्रमाने अर्थ आणि आकार दिला. अशा आदर्श मातेबद्दल आदिकसाहेबांच्या बोलण्यातून, आठवणीतून मी प्रभावीत झाले आणि ‘माय जानकी ‘कवितासंग्रह आकाराला आला आहे, संतकवी एकनाथ डांगे यांनी दिलेला हा पुरस्कार मला स्फूर्तीदायक आहे असे सांगून हा कवितासंग्रह मान्यवरांना देऊन सन्मान केला.
बाबासाहेब चेडे यांनी सांगितले, मी कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात पत्रकारिता करीत आहे. आमची कोणी फारशी दखल घेत नाहीत. ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम होतात परंतु त्यांना जास्त प्रसिद्धी मिळत नाही, पण आम्ही निराश न होता हे कार्य मनापासून करतो. संतकवी एकनाथ डांगे यांनी दिलेला पुरस्कार माझ्या कार्याला प्रकाशदायी असल्याचे सांगितले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी एकनाथ डांगे यांच्या साहित्यसेवा आणि पत्रकरिता योगदानाचा गौरव करून डॉ.शिवाजी काळे, संगीता फासाटे, बाबासाहेब चेडे यांच्या साहित्य आणि वृत्तपत्र कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कु.सुकन्या शिवाजी काळे, श्रीराम मंदिराचे पुजारी विश्वहिंदू परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य कुणाल करांडे आदींसह भक्तगण उपस्थित होते. एकनाथ डांगे यांनी आभार मानले.