अहिल्यानगर
करंजी येथील भावले वस्तीवर दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत एक ठार एक जखमी
राहुरी शहर/ अशोक मंडलिक : पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला असुन दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले वय वर्षे 80 यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले वय वर्षे 76 यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या घटनेत जखमी भावले या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दरोडेखोरांनी ओरबडून नेली. तर मयत गोपीनाथ भावले यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये म्हणून त्यांच्या घरावर देखील दरोडेखोरांनी दगडफेक केली. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. एका गरीब कुटुंबातील व्यक्तीचा या दरोड्यामध्ये जीव गेल्याने करंजीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वीस वर्षापूर्वीची पुनरावृत्ती…
वीस वर्षांपूर्वी करंजीच्या पोलीस चौकी जवळ राष्ट्रीय महामार्गावरील स्वर्गीय रामरतन मुखेकर गुरुजी यांच्या घरावर दरोडा पडून या घटनेत रामरतन मुखेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांच्या मदतीला आलेले त्यांचा मुलगा स्वर्गीय अण्णासाहेब मुखेकर देखील या घटनेत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे भावले वस्तीवर पडलेल्या दरोड्यामुळे करंजीत वीस वर्षापूर्वीची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा ग्रामस्थांमधून आहे. घटनास्थळी गावचे सरपंच बाळासाहेब आकोलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख यांच्यासह अनेकांनी भेट देऊन भावले कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.