अहिल्यानगर

जनावरांचे आठवडे बाजार पुन्हा सुरु करण्यास अटी व शर्ती

अहमदनगर प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये लाळ खुरकूत तसेच लंम्पी स्कीन डीसीज या रोगाचा प्रसार होवू नये याकरिता बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील जनावरांचे बाजार पुन्हा सुरु करण्यास अहमदनगरचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अटी व शर्ती लागू करत परवानगी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात जनावरांचे लाळखुरकुत रोगामुळे पशुधनाचे पर्यायाने पशुपालकांचे खुप मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. यामुळे देश पातळीवर एकाच वेळी नियमीत फेरीचे नियोजन करुन सन २०२५ पर्यंत लाळखुरकुत या रोगावर नियंत्रण मिळविणे व सन २०३० अखेर रोगाचे समुळ उच्चाटण करण्याचे लक्ष केंद्र शासनाने निर्धारीत केले आहे.
कृषि, पदुम विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडील दि. ०२ जुन २०२० चे शासन निर्णयान्वये सदर योजनेचे राज्यात प्रभावीपणे संनियंत्रण करण्यासाठी विविध संनियंत्रण समित्यांचे गठण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून तहसीलदार हे तालुका स्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. देश पातळी वरील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा / रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांचे नमुने तपासणी अहवाला नुसार अहमदनगर जिल्ह्यात लाळखुरकुत रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. अहमदनगर जिल्ह्यात लाळखरुकुत रोगाचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रादुर्भाव लक्षात घेता, लाळखुरकुत रोग आटोक्यात येई पर्यंत जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते.
अहमदनगर जिल्ह्यात लाळखुरकुत रोगाचा मोठ्या प्रमाणावर वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रण व जिल्ह्यातील लसीकरण ८०.१३ टक्के पुर्ण झाल्याने दि. ३० सप्टेंबर २०२१ पासून नवीन ठिकाणी लाळखुरकुत रोगाचा प्रादुर्भाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाल्याचे दिसून येत नसलेने, जिल्हा पशुसंवर्धनउपआयुक्त यांच्या दि. ०८ ऑक्टोबर २०२१ रोजीचे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्या संबंधातील आदेश रद्द करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार पुन्हा सुरु करणेसाठी अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे.
लसीकरण झालेल्या जनावरांनाच बाजारामध्ये प्रवेश देण्यात यावा, त्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, बाजारामध्ये ज्या जनावरांना ईनाफचा १२ अंकी इयर टॅग लावलेला असेल अशा जनावरांस प्रवेश देण्यात यावा, सदर झालेले लसीकरण हे ईनाफ प्रणालीवरती नोंदविले गेल्याची खात्री बाजार समितीने करावी, लसीकरण न करता जनावर बाजारा मध्ये आणल्यास रु. २००/- पर्यंतचा दंड व्यापार्यास करावा, या अटी व शर्ती लागू करत सदरचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्तरीय सनियंत्रण समिती राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम ( एनएडीसीपी ) चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दिला आहे. 
संबंधित आदेशाच्या प्रति या अहमदनगर महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अहमदनगर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button