अहिल्यानगर
गॅसच्या पाईपलाईनसाठी नगर-मनमाड महामार्गावर झाडांची बेकायदा कत्तल..!
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : नगर-मनमाड महामार्गावरून टाकण्यात येणार्या गॅसच्या पाईपलाईनसाठी महामार्गालगतच्या मोठ्या झाडांची खुलेआम बेकायदा कत्तल होत असल्याने वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बेकायदा वृक्षतोड करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून वृक्षांची कत्तल थांबवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून नगर-मनमाड महामार्गावरून कोल्हारच्या दिशेकडून संबंधित ठेकेदाराने गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी महामार्गाच्या लगतचा रस्ता खोदाईही सुरू आहे. तर पाईपलाईन टाकण्याच्या कामात आडवे येणारे वृक्ष बेकायदा तोडण्यात येत आहेत. त्यावर अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. ही झाडे वनखाते किंवा सामाजिक वनीकरण खात्याच्या अधिकारात येतात का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत. या पाईपलाईनसाठी महामार्गावरील मोठी झाडे, नुकतीच लावण्यात आलेली झाडेही तोडण्यात येत आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.