ठळक बातम्या
सुरत- हैदराबाद महामार्ग; जमिनीच्या मोबदल्यात बदल नाही : राज्यमंत्री तनपुरे
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : केंद्र शासनाचा प्रस्तावित असलेला सुरत- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या शेतजमिनीच्या किंमतीचा मोबदला निम्म्याने कमी मिळणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होऊ लागल्याने संदिग्धता निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले होते. यासंबंधी आज मंत्री तनपुरे यांनी मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या भावना मंत्री थोरात यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावर सखोल चर्चा झाली. सुरत- हैदराबाद या रस्त्यामध्ये जाणाऱ्या शेत जमिनीचा मोबदला केंद्र सरकारच्या दरानुसार मिळणार असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनी बाबतच्या किंमती निम्म्याने कमी करण्यात आलेल्या आहेत. मात्र सुरत हैदराबाद या रस्त्यासाठी संपादित होणाऱ्या जमीन किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे मंत्री थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.
राहुरी- नगर- पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेत जमिनी संपादित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या रस्त्यासाठी नवीन शासन निर्णय लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोबदलाही कमी मिळणार नाही असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतः अधिकचे लक्ष घातलेले आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचीही आपली तयारी आहे. शेत जमिनीचा भाव कमी मिळेल अशी भीती आता कोणीही बाळगू नये व चिंता करू नये असे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.
केंद्र शासनाच्या नियमानुसार संपादित होणाऱ्या शेत जमिनी, घरे, विहीर, फळबागा, जनावरांचे गोठे यासाठी वेगवेगळे दर आहेत. या शेतकऱ्यांचा समावेश ज्या भागात असेल तशी वर्गवारी करून मोबदला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.