अहिल्यानगर

सात्रळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नवनाथ शिंदे इंटरनॅशनल ब्रिलिअन्स अवॉर्डने सन्मानित

बाळकृष्ण भोसले/चिंचोली : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील मराठी विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. नवनाथ अंगद शिंदे यांना विविध वाड्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरील उपक्रमांच्या आयोजनाबद्दल तसेच अध्ययन, अध्यापन, संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जयपूर (राजस्थान) येथील मिडीया सेंटरने इंटरनॅशनल ब्रिलिअन्स अवॉर्ड २०२१ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सन्मान देऊन नुकतेच गौरवण्यात आले आहे.


प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या यशाबद्दल सात्रळ महाविद्यालयानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. (डाॅ.) सोमनाथ घोलप होते. यावेळी डॉ. रामदास बोरसे, डॉ. बाबासाहेब सलालकर, डॉ. भाऊसाहेब नवले, प्रा. एकनाथ निर्मळ, प्रा. आदिनाथ दरंदले, कार्यालयीन अधीक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे आदी उपस्थित होते.

विद्यार्थिप्रिय शिक्षक, व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. नवनाथ शिंदे हे सात्रळ महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय सेवा योजना आणि कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अनेक उपक्रमात ते क्रियाशील सहभागी होते. डॉ. शिंदे यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचे दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांचे बहात्तर संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती ज्ञानमंडळात नोंदलेखक म्हणून त्यांनी लेखन केले आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त वक्ते असून एम. फिल., पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांना विविध संस्थांकडून दोन आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय व अकरा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डाॅ.) सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button