अहिल्यानगर
जिवनात ध्येय निश्चित असेल तर यश हमखास- ढुस
राहुरी फॅक्टरी : जिवनात ध्येय निश्चित असेल तर यश हमखास मिळते, असे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी प्रतिपादन केले.
पुणे येथे दि. १७ पासून आयोजित विभागीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणेसाठी निवड झालेल्या महिला व पुरुष संघातील खेळाडूंना राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने खेळाचे किट भेट देऊन शुभेच्छा देणेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी आप्पासाहेब ढुस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे, प्रमुख पाहुणे म्हणून योग प्रशिक्षक किशोर थोरात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे, अहमदनगर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव पुजारी, जाधव, तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे शहर, पुणे ग्रामीण, आदी ठिकाणाहून तुल्यबळ स्पर्धकांच्या जरी तुम्हाला सामना करावा लागणार असला तरी तुम्हाला या ठिकाणी मिळणारे पुजारी, जाधव, तुपे यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि तुमच्या समोर असलेले ध्येय तुम्हाला नक्की यश मिळवून देईल, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निश्चित ध्येय ठेवा यश तुमचेच असेल असे सांगून ढुस यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी रामभाऊ काळे आणि किशोर थोरात आदिंनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पुजारी यांनी सर्वांचे आभार मानले.