पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा
विलास लाटे/पैठण : तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातुन सावरण्यासाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने (दि.१) रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व स्थानिक खासदार तथा नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करण्याचे नाटक करत सालाबादाप्रमाणे फोटोसेशन केले आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम या नेतेमंडळींनी केले आहे. यापूर्वी कित्येक वेळा ओला दुष्काळ पडल्याचे आपणास ज्ञात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचा हवामान विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग या सर्व विभागांनी संयुक्त अभ्यासातून मूलभूत संरचना उभी करणे गरजेचे होते.
ज्यानुसार उभ्या पिकात किती काळ ओलावा राहिला, पाणी साचून राहिले तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाईल अशी माहिती एकत्रित करून झालेली अतिवृष्टी आणि संकलित माहिती एकत्रित करून, पंचनामा करण्याची गरज न करता सरसकट उपलब्ध माहितीच्या आधारे वस्तुस्थिती दर्शविणारे घटक लक्षात घेऊन संवेदनशीलपणे शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत घोषित करण्यासाठी तत्परता दाखवायला हवी होती. परंतु आपली शासन व्यवस्था ब्रिटिशकालीन व्यवस्थापेक्षाही जास्त शोषण करणारी झाली असल्याची खरमरीत टीका निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टी पावसामुळे फळबाग पिकाची जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या काळामध्ये फळधारणा होणार नाही.
यासंदर्भात शासनाने सखोल आणि तत्परता दाखवत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा नसता शेतकरी बांधवांना सोबत घेऊन छावा क्रांतीवीर सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, मराठवाडा सचिव भगवान सोरमरे, ज्ञानेश्वर तांगडे, अनिल मगरे, विलास संत, कृष्णा काळे, राकेश वाघे, कार्तिक बावणे, अशोक सामसे आदी उपस्थित होते.