अहिल्यानगर
पीपल्स रिपाइं उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी किशोर वाघमारेंची निवड
चिंचोली/प्रतिनिधी : माजी खासदार व विद्यमान विधानसभा सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे प्रणित पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी आंबेडकर चळवळीचे अहमदनगर जिल्ह्यातील युवक कार्यकर्ते संगमनेर तालुक्यातील खळी येथील किशोर वाघमारे यांची निवड करण्यात आली.
मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी वाघमारे यांची निवड घोषित केली. त्यांना निवडीचे पत्र पक्षाचे मुख्यालय असलेल्या ‘भीमालय’ नरिमन पॉईंट मुंबई येथे प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश नन्नवरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातून उपस्थित होते.
किशोर वाघमारे यांनी जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटांमध्ये अनेक पदे भूषवली असून उत्तर नगर जिल्ह्यात वाघमारे यांचे सहा तालुक्यांमध्ये उत्तम संघटन आहे ते राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. त्यांनी गवई गटात असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक शाखांच्या माध्यमातून तरुणांची फळी उभी केली आहे. गवई गटात राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा सरचिटणीस, कार्याध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख, संगमनेर तालुका अध्यक्ष अशी प्रमुख पदे भुषविली असल्याने पक्षवाढीसाठी फायदा होणार असून अनुभवी कार्यकर्ता पक्षाला मिळाला आहे.
वाघमारे व त्यांच्यासमवेत पक्षात आलेल्यांना सन्मानाची वागणूक मिळेल पीपल्स रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत असून त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक ताकद दिली जाणार असल्याचे प्रसंगी प्रा. कवाडे म्हणाले. उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, पारनेर, पाथर्डी, नेवासा, नगर तालुका आदी महत्वाच्या तालुक्यात पक्षाचे मजबूत संघटन झाले असून या तालुक्यात त्यांनी ‘गाव तिथे शाखा अभियान’ राबवावे, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केले.
वाघमारे यांनी आपल्याला पदाची अपेक्षा नसून समाजातील शेवटच्या घटकाचे विविध सामाजिक प्रश्न प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त करत उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणार असल्याचे सांगत लवकरच संगमनेर आणि शिर्डी येथे पक्षाचा भव्य निर्धार मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. कवाडे व कार्याध्यक्ष जयदीप कवडे यांच्या उपस्थितीत घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर तालुका अध्यक्ष जालिंदर बोरुडे, सरचिटणीस गोरख बनसोडे, युवा तालुका अध्यक्ष गौतम सिताराम रोहम, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अनिताताई दत्तात्रय वाघमारे, राहता तालुका अध्यक्ष जॉन पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाळंदे, युवा तालुका अध्यक्ष नितिन बनसोडे, सुनील बनसोडे, रवीना कदम, राहुरी तालुका अध्यक्ष प्रताप उर्फ पप्पू पवार, जिल्हा उपाध्यक्ष कैलासराव पवार, करण साठे, धोंडीराम दिवे, नेवासा तालुका अध्यक्ष मधुकर पावसे, युवा अध्यक्ष श्रीकांत भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, सरचिटणीस विजय कांबळे, पारनेर तालुका अध्यक्ष राहुल गंगाळे, कोपरगावचे सिद्धार्थ मेहेरखांब, अकोलेचे राजेंद्र गवांदे, गौतम निळे, पाथर्डीचे सुमंतराव जावळे, नगर तालुका अविनाश भिंगारदिवे, श्रीरामपूर रवींद्र फरार, श्रीकांत त्रिभुवन, नितीन बोराडे, अक्षय गायकवाड, ज्योतीताई काळे, दत्तात्रय वाघमारे, आदिंनी पक्षात जाहीर प्रवेश केला तर जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.