शिक्षणवारी ज्ञान पंढरी
सौ. वाघुंडे यांना मिळालेला स्व.प्रा.विजया कुऱ्हे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रेरणादायी – प्राचार्य अनारसे
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : शिक्षक हे राष्ट्र घडविणारी आदर्श पिढी तयार करतात. अशा सेवाभावी वाटेवर माउली वृद्धाश्रमाच्या संस्थापिका सौ.कल्पनाताई सुभाष वाघुंडे यांना विजयानंद सरगम वाचक ग्रुपचा स्व. प्रा. सौ. विजयाताई नंदकिशोर कुऱ्हे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मिळालेला आदर्श शिक्षिका पुरस्कार अनेक महिलांना प्रेरणादायी असल्याचे मत माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी व्यक्त केले.
येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचालित माउली वृद्धाश्रमात शिक्षकदिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. 30 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त झालेल्या आणि माऊली वृद्धाश्रमाच्या संस्थापक संचालिका यांना विजयानंद सरगम वाचक ग्रुपच्या स्व. प्रा. सौ. विजयाताई नंदकिशोर कुऱ्हे स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा 2021 चा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वृद्धाश्रमासाठी प्रा. कुऱ्हे यांना मोठा फ्रिज, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देण्याचा तसेच वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पुस्तके भेट देण्यात आली.
प्रारंभी श्रीस्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपज्योती प्रकाशमान करण्यात आले. संयोजक प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचा सत्कार केला. प्राचार्य शंकरराव अनारसे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ. कल्पनाताई वाघुंडे यांना प्रदान करण्यात आला तर वृद्धाश्रमाचे संस्थापक, संचालक सुभाष वाघुंडे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी केला. मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, बुके देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन सौ. संगीता अशोकराव कटारे, फासाटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अनारसे पुढे म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थी नाते हे सर्वश्रेष्ठ असते, हे कार्य सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी प्रामाणिकपणे केले, त्यांचे शैक्षणिक कार्य मौलिक स्वरूपाचे आहे, त्याचबरोबर त्यांनी मातृवत्सल भावनेने 2017 पासून आपल्या पतीला साथ देत वृद्धाश्रम सूरू करून सेवाभावाचा श्रीरामपुरात आदर्श निर्माण केला, त्यांच्या या कार्याला बळ आणि प्रतिष्ठा समाजाकडून मिळावी अशी अपेक्षा करून प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी पत्नीच्या नावे जो दानाचा कर्मयोग सुरु ठेवला तो कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी वाघुंडे परिवार म्हणजे सेवा आणि नम्रता यांचा आदर्श असल्याचे सांगितले. सुभाष वाघुंडे यांनी आपल्या सर्व शिक्षकवर्गाचा मनापासून सत्कार करून वृद्धाश्रमात खरा शिक्षकदिन साजरा केला असे सांगितले. प्रमुख पाहुणे दैनिक स्नेहप्रकाश कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे म्हणाले, प्रा. नंदकिशोर कुऱ्हे आणि डॉ. बाबुराव उपाध्ये त्यांच्या विजयानंद सरगम वाचक ग्रुपने अतिशय आगळावेगळा असा शिक्षकदिन केला आहे. दुर्लक्षित वृद्धांना हा ज्ञानाचा आणि सेवेचा कार्यक्रम अनुभवण्यास मिळाला. सौ. कल्पनाताई वाघुंडे यांचे कार्य खूप मोठे आहे, शासन पातळीवर त्यांना पुरस्कार लाभला तर त्यांच्या कार्याला बळ आणि प्रतिष्ठा लाभेल, त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
प्रा. सौ. मंजिरी सोमाणी यांनी स्व. प्रा. सौ. विजयाताई कुऱ्हे यांच्या आठवणी सांगितल्या, सुखदेव सुकळे यांनी वाघुंडे परिवार हा समर्पण आणि सेवेचा आदर्श असल्याचे सांगितले. सुभाष वाघुंडे, सौ. वाघुंडे यांनी देणगीदार आणि शिक्षक यांचा सत्कार केला. सुभाष वाघुंडे यांनी माऊली वृद्धाश्रमाची वाटचाल सांगितली. सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी प्रा. कुऱ्हे सर यांनी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन केलेला हा सन्मान मला नेहमीच प्रोत्साहन देणारा असून स्व. प्रा. कुऱ्हेताई यांच्यावरील पुस्तक वाचून मी प्रभावीत झाले असे मत व्यक्त केले. सौ. अनसूया सोनसळे यांनी “माझा सुभाषबाळ”हा पाळणा सादर केला. अनेकांनी वृद्धाश्रमाला देणग्या दिल्या.
प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, माउली वृद्धाश्रमात श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वृद्धांना राहण्यासाठी चांगली इमारत उभी राहत आहे, त्यासाठी योगदान लाभले तर हे सेवाकार्य लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या, माजी मुख्याध्यापक बबनराव तागड, फोटोग्राफर संजय पगारे, लेविन भोसले, प्रा. शिवाजीराव बारगळ, लक्ष्मीबाई पालवे, सतोबा राऊत, दिनकरराव पोखरकर, सुरेश गड्डगुरुजी, सुनील शेरकर, राजेंद्र रासणे, सुरेश गिरमे, प्रा.जलील पठाण, अरुण विसपुते, वंदना विसपुते, उषाताई मुंदडा, वाल्मिक जरहाड, रवींद्र शेजूळ, राजेंद्र देशपांडे, गौरव रासणे, अप्पासाहेब गवळी, बनकर सर, बुध्दिवंत सर आदी उपस्थित होते. अनेकांनी वाघुंडे पतिपत्नीचा सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.