अहिल्यानगर
‘मधुमक्षिका पालन मास्टर ट्रेनर’ म्हणून औताडे यांची निवड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारत सरकारच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (सी. बी. आर. टी. आय., पुणे) यांचे द्वारे देशभरात शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आयोजना बरोबरच मधमाशी विषयाचे संशोधन केले जाते. त्याचा विस्तार वाढवा म्हणून मधमाशी पालन व प्रशिक्षण विषयावर नैपुण्य मिळवणाऱ्या व्यक्तींना ‘मधुमक्षिका पालन मास्टर ट्रेनर’ म्हणून निवड करून त्यांच्या द्वारे मधमाशी पालन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.
त्याच धर्तीवर ऋषीकेश औताडे यांना नुकतेच ‘मधुमक्षिका पालन मास्टर ट्रेनर’ म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. ते गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून मधमाशी पालन विषयावर जनजागृती करत आहेत. त्यांनी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथून एक महिन्याचे मधुमक्षिका पालन कोर्स, एक दिवसाचे मध तपासणी प्रशिक्षण तसेच, दहा दिवसांचे मधपाळ प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ मध संचालनालय महाबळेश्वर येथून पूर्ण केले. त्यांना शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात अकरा वर्षाचा अनुभव असून ते नेट प्राध्यापक परीक्षा उत्तीर्ण आहेत. सध्या, श्रीरामपूर येथे गोदागिरी फार्म्स या कृषी स्टार्टअपचे ते संचालक म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परागीभवणसाठी मधमाशी पेटी पुरवत असून, सेंद्रिय शेती, गांडूळखत, अळिंबी उत्पादन व व्यवसाय व्यवस्थापन विषयावर व्याख्यानपर जागृती करत आहेत.
२५ प्रशिक्षणार्थी बॅच साठी पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण त्यांच्या गावांमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये व घराजवळच्या ठिकाणी आयोजित करावयाचे असल्यास फी रु. ११८०/- प्रती प्रशिक्षणार्थी रक्कम सी. बी. आर. टी. आय., पुणे येथे भरावी. प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर त्यांचे द्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राचा उपयोग शासनाच्या विविध योजना, त्या संदर्भातील संधी व व्ययसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षणार्थी यांना होईल. प्रशिक्षणासाठी वरील फी व्यतिरिक्त बाकी कोणताही खर्च येणार नाही. औताडे यांच्या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथे न जाता घराजवळ प्रशिक्षक उपलब्ध झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.