अहिल्यानगर
हरिगाव मतमाउली यात्रापूर्व आठवा नोव्हेना शनिवार संपन्न
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : हरिगाव येथील मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा आठवा शनिवार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी नोव्हेनाप्रसंगी श्रीरामपूर येथील लोयोला सदन प्रमुख धर्मगुरू ज्यो गायकवाड यांनी प्रतिपादन केले की आजचा विषय आहे पद्वाचा संत अंतोनी व पवित्र मारिया. सर्व संतांमध्ये प्रसिद्ध संत म्हणजे संत अंतोनी. त्याने अनेक चमत्कार केले आहेत. संत अन्तोनीची पवित्र मारीयेवर नितांत भक्ती होती आणि तो पवित्र मारीयेचा एक चांगला शिष्य होता. त्याच्या पावित्र्याचा व ज्ञानाचा उगम, देवावरील श्रद्धा व प्रेम धन्य कुमारी मातेचे प्रेम यातून झाले आहे. संत अन्तोनीने मोठ्या धैर्याने, विश्वासाने पवित्र मारीयेवर अनेक प्रवचने दिली आहेत आणि पवित्र मारीयेच्या प्रेमामुळे व भक्तीमुळे त्याने पवित्र मारीयेप्रमाणे शुद्धता, गरिबी, दयाकृत्ये हे गुण अंगिकारले. तो पवित्र मारीयेशी एव्हढा एकरूप झाला की पवित्र मरीयेने आपले येशू बाळ त्याच्या स्वाधीन केले.
संत अन्तोनीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्याने पवित्र मरीयेच्या मातृत्वाची प्रशंसा केली. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पवित्र मारीयेचा निष्कलंक गर्भसंभव यावर त्याने गाढ विश्वास ठेवला. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पवित्र मारीयेचे क्रौमार्य हे चिंताधिन होते. येशूच्या जन्माअगोदर व येशूच्या जन्मावेळी व येशू जन्मानंतरसुद्धा पवित्र मारिया निष्कलंक राहिली. पवित्र मारिया सदेह स्वर्गात घेतली गेली. हा सुद्धा संत अन्तोनीचा दृढ विश्वास होता. संत अन्तोनीने जसे प्रेम पवित्र मरीयेवर केले देव शब्दावर मनन चिंतन केले आणि त्यामुळे तो पवित्र मारीयेचा भक्त झाला. तसेच आपण सुद्धा देव शब्दावर मनन चिंतन केले प्रार्थना केली तर परमेश्वर आपल्याला सुद्धा संत अन्तोनीप्रमाणे अनेक आशीर्वाद देईल आणि पवित्र मारीयेने जसे संत अन्तोनीला उंच केले तसे पवित्र मारिया सुद्धा बाळ येशुव्दारे आपल्याला उंच करील व आपले जीवन सुखी समाधानी करेल. असा आपला विश्वास आहे. याप्रमाणे पवित्र मारियाची महती सांगितली.
या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी हे सहभागी होते. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सर्व भाविकांना यु ट्यूब प्रसारमाध्यमातून घरबसल्या पहावयास मिळाले. येत्या नवव्या व शेवटच्या नोव्हेनाच्या शनिवारी ४ सप्टे रोजी रे फा.प्रकाश भालेराव यांचे प्रवचन होईल. दिनांक १ सप्टे रोजी ध्वजारोहण व “पवित्र मारिया विश्वासाची राणी”या विषयावर फा.ऐरल फर्नांडीस एस जे यांचे प्रवचन होणार आहे, अशी माहिती प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी दिली.