अहिल्यानगर

निर्मळ मनाने जगण्यातच खरे सुख आहे – अप्पासाहेब कदम

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जीवन खूप सुंदर आहे, योग्य वयात योग्य निर्णय घेतले की समाधान मिळते, आपलेपणा टवटवीत राहिला की संबंध टिकतात. त्यासाठी लेखन, वाचन आणि माणुसकीची संस्कृती वाढविण्यासाठी निर्मळ मनाने जगण्यातच खरे सुख असल्याचे मत अप्पासाहेब कदम यांनी व्यक्त केले.
येथील खासदार गोविंदराव लॉ कॉलेज परिसरातील अप्पासाहेब कदम यांच्या प्रांगणात ‘साहित्य आणि जीवन ‘या विषयावर वाचन संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या चर्चेत अप्पासाहेब कदम बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अप्पासाहेब कदम यांना विविध पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, अधिस्वीकृती समितीचे सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. शिवाजीराव बारगळ, राधिकाताई कदम आदी उपस्थित होते. यावेळी घरी स्थापित केलेला गौतम बुद्ध सुंदर पुतळा आणि आपले अनुभव सांगताना अप्पासाहेब कदम यांनी आपली सामाजिक मानसिकता आणि माणूसपणाची जाणीव याविषयी अनुभव सांगितले, शिक्षण वाढले आणि माणसे अधिक प्रागतिक होत असताना दिसतात. तरीही ज्या युगपुरुषांनी माणुसकीचे तत्वज्ञान सांगितले, जगासाठी महामानव जगले पण त्यांना त्या त्या समाजघटकांसाठी मर्यादित का केले गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपण मुलगा, मुलगी यांच्यात वेगळेपणा न करता सर्व साधन, संपत्ती समानतेने दिली व आपण मोकळेपणाने समाधानी राहत आहोत, असे कदम यांनी सांगताच पत्रकार कुलथे यांनी त्यांचे कौतुक केले, तुमचा आदर्श सर्वांनी जपला तर कुटुंब सुखी होईल असे सांगितले. प्राचार्य शेळके यांचे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खुंटेगाव ते श्रीरामपूरचे कायमचे वास्तव्य याविषयी माहिती देऊन ‘आनंदयात्री ‘गौरवग्रन्थ, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे लिखित ‘तुळशीरामची झेप’, सुखदेव सुकळे लिखित ‘समर्पित प्रकाशयात्री, डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘भारतीय कुंभार समाजातील संत ‘, ‘समाजचिंतन ‘, संपादित ‘मातृपितृ देवोभव ‘, प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील लिखित ‘मंगलपर्व ‘इत्यादी पुस्तकावर चर्चा झाली.
पत्रकार प्रकाश कुलथे यांनी आपले जीवन अनुभव सांगितले. पत्रकार अण्णा पेंडसे यांच्याकडे आदर्श पत्रकारितेचे धडे मिळाले, श्रीमंतांच्या घरी आईबरोबर धुणी, भांडी करीत असताना उच्च शिक्षण घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 32 मिनिटाची घेतलेली मुलाखत आणि पत्रकारितेचे अनुभव सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आपला जीवनप्रवास सांगितला. त्याबद्दल अप्पासाहेब कदम यांनी कष्ट आणि जीवनसंस्कार यातून सर्वांचे जीवन घडले. श्रीरामपूर भूमीशी सेवाभावाने कार्यरत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून आपले सामाजिक, कृषीविषयक आणि येवला भागात राबविलेले पाणी प्रकल्प असे अनेक अनुभव सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार प्रकाश कुलथे या दोघांचे जीवन खूपच खडतर होते, पण या दोघांनी उपासमार, कष्ट सोसत, अनेक अडचणीवर मात केली, हे आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे. प्रकाश कुलथे यांनी आता आनंदाने प्रकाशाची दिवाळी साजरी करावी, दुःख विसरावे असे आवाहन केले. यावेळी अशोकराव गायकवाड, शरदराव मोरे यांनी नियोजन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button