कृषी
नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी हवामान आधारित कृषि सल्ला सेवा महत्वाचे साधन – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर येणार्या नैसर्गिक समस्यांचे निवारण करण्यासाठी हवामान आधारित कृषि सल्ला सेवा या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कृषि उत्पादन वाढ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत माहिती आणि दळणवळणाच्या साधनांद्वारे हवामानावर आधारित कृषि सल्ला सेवा या विषयावर तीन आठवड्याचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड, नवी दिल्लीतर्फे नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंग उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ शरद गडाख, नवी दिल्ली येथील प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेडचे व्यवस्थापक राजीव अहल हे उपस्थित होते. यावेळी डॉ. विनोद कुमार सिंग यांनी आपल्या भाषणात बोलतांना हवामान बदलामुळे कृषि क्षेत्रावर होणार्या परिणामांचा उल्लेख केला व केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद अंतर्गत करण्यात आलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली. यात जिल्हानिहाय आपत्कालीन पीक व्यवस्थापन, हवामान संवेदनक्षम गावे, पाणी व्यवस्थापन व पीक दिनदर्शिका यांचा प्रामुख्याने उल्लेख केला व कास्ट प्रकल्प, राहुरी यांनी कोरोना काळात सुरु केलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे कौतुक केले.
या अभ्यासक्रमाचे संयोजक प्रकल्प प्रमुख (कास्ट) डॉ. सुनिल गोरंटीवार, जीआयझेड, नवी दिल्लीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष, सहसंयोजक डॉ मुकुंद शिंदे, जीआयझेड, पुणेचे संचालक इंजि. रणजीत जाधव, सहसंचालक म्हणुन डॉ. रवि आंधळे, विभाग प्रमुख डॉ. जयवंत जाधव यांनी काम पहिले. तसेच या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणुन डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. स्नेहल कानडे, व इंजि. मोहसीन तांबोळी यांनी केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी देशभरातून एकूण 107 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते व त्यांना कृषी हवामानशास्त्र विषयातील देशभरातील 35 तज्ञ शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.