यशाच्या प्राप्तीसाठी वास्तवात राहून आनंदाने जीवन जगा – सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे

राहुरी विद्यापीठ : मानवी जीवन खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगण्यासाठी प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जे काही चांगले आहे ते स्वीकारा. मी पणा सोडा. चांगले कर्म करत रहा, त्याचे फळ चांगले मिळेल. जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी वास्तवात राहून आनंदाने जीवन जगा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ-2025 च्या निमित्ताने स्पर्धेशिवाय यश या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सचिन नलावडे बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणुन पुणे येथील विश्वकुलम संस्थेचे संस्थापक इंजि. विश्वनाथ पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास कांबळे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गडगे, अक्षय उर्जा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बारई व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.
यावेळी इंजि. विश्वनाथ पाटील स्पर्धेशिवाय यश या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की जीवनात प्रत्येक बाबतीत यश मिळविणे, यशस्वी होणे हे प्रत्येकाचे ध्येय असते. आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा असते. या स्पर्धेतूनच तणाव निर्माण होतो व या तणावामुळे आपण आपल्या जगण्यातील खरा आनंद हरवून बसतो. त्यासाठी यशस्वी होणे म्हणजे काय हे समजून घ्या. आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रेमाने करा, आनंदाने करा, त्याचा आनंद घेवून पुढे जा. भविष्यातील यश मिळविण्यासाठी केलेली ती तयारी ठरेल. आपले आयुष्य आपल्या ताब्यात असले पाहिजे. दुसर्याशी तुलना न करता, कोण काय म्हणेल याचा विचार न करता आयुष्य जगता आले पाहिजे. आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी विसरुन वास्तवामध्ये प्रत्येक क्षण आनंदात जगणे महत्वाचे आहे. सध्याची परिस्थिती जशी आहे तशीच स्वीकारणे व पुढे दमदारपणे आयुष्याची वाटचाल करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय घाणेकर याने तर आभार डॉ. महेश पाचारणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
				


