भूसंपादनाशिवाय चारी दुरुस्तीचा हट्ट — क्रांतीसेनेचा संताप!
हिरडगावात कुकडी चारीचे काम थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत हिरडगाव परिसरातील चारी दुरुस्तीचे काम भूसंपादनाची नुकसानभरपाई न देता सुरू केल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने या कामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २, श्रीगोंदा यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कुकडी प्रकल्पांतर्गत हिरडगाव भागातील चारीचे मूळ काम सुमारे २७ वर्षांपूर्वी झाले होते. त्यावेळी शेकडो शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या गेल्या, मात्र आजवर एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाईचा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही.
वारंवार पाठपुरावा करूनही भूसंपादनाचा प्रस्ताव अद्याप रखडला असून, शेतकऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. “सरकारने नुकसानभरपाई दिल्याशिवाय चारी दुरुस्तीचे काम सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल,” असा तीव्र इशारा क्रांतीसेनेने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर कुकडीच्या पाण्याबरोबरच शेतकऱ्यांचा रोषही ओसंडून वाहील, असा इशारा अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, तालुकाध्यक्ष संदीप डेबरे, हिरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विद्याताई बनकर, संपतराव दरेकर, संतोष दरेकर, व्हा चेअरमन सौ. शोभाताई दरेकर, अनिल दरेकर, चिमाजी दरेकर, अमोल दरेकर,चेअरमन भरत भुजबळ, कैलास दरेकर, रामदास बनकर, सचिन दरेकर, विजय मोधळे, भाऊसाहेब भुजबळ, नवनाथ गुणवरे, शरद भुजबळ, सचिन बनकर, नानासाहेब दरेकर, सतिश भुजबळ, देवराव दरेकर आदींसह शेतकऱ्यांनी दिला आहे.



