सणासुदीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन बांधावर

राहुरी (प्रतिनिधी) : दसरा सारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशीही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात प्रशासन सहभागी झाले. राहुरी तालुक्यातील कोंढवड व शिलेगाव परिसरात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे केले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका, घास या महत्त्वाच्या पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मेहनतीने पिके वाढविलेल्या शेतकऱ्यांच्या आशा अक्षरशः पाण्यात गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोंढवड परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या आशेने शेती पिकांवर मोठा खर्च केला. परंतु सप्टेंबरमधील अतिवृष्टीने सर्व श्रम वाया गेले असल्याचे चित्र आहे.
काल दसऱ्याचा सण होता. सर्वजण हा सण कुटुंबासोबत घालवत होते. परंतु शेतकऱ्यांना शासनाची मदत दिवाळीपूर्वी मिळावी या हेतूने तलाठी राहुल कराड, कोंढवड ग्रामसेवक सुखलाल हारदे, शिलेगाव ग्रामसेवक सविता बाचकर व कृषी सहायक भारती ढगे यांनी दसऱ्याच्या दिवशीही प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले. हेच नाही तर आपल्याकडे पाच दिवसांचा आठवडा असताना शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस होते. मात्र याही दिवशी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत होते.
यावेळी वेणूनाथ हिवाळे, गणपत म्हसे, बबन सातपुते, देविदास म्हसे, प्रसाद म्हसे, सुभाष बर्डे, समीर सातपुते आदींनी सहकार्य केले. या प्रसंगी मधुकर म्हसे, विष्णू म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, पांडुरंग म्हसे, संदीप उंडे, परशुराम कोळसे, रमेश म्हसे, सुरेश म्हसे, राजेंद्र पेरणे, कृष्णा म्हसे, किशोर म्हसे, सचिन म्हसे, निलेश म्हसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.