श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुका स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

देवळाली (प्रतिनिधी): श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या मागणीला चालना देत, देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुका निर्माण करण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करून या मागणीसाठी विनंती केली.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सदस्य अजित कदम, भास्कर कोळसे, प्रा. अरविंद सांगळे, शामकांत खडके, महेश औटी, अनिस पठाण, योगेश सिनारे, मयूर कदम, संतोष धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, श्रीरामपूर जिल्हा मागणी जवळपास ४४ वर्षांपासून प्रलंबित असून, अलिकडे जिल्हा विभाजन अपेक्षित असताना, शासनाने फक्त अहिल्यानगर नामांतर करत खरा सामाजिक प्रश्न बाजूला ठेवला आहे. श्रीरामपूर जिल्हा निकषांच्या आधारे कमी खर्चात होऊ शकतो.
अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ गोवा राज्याच्या ५ पट व दिल्ली राज्याच्या ११ पट मोठे असल्यामुळे प्रशासनावर आपत्कालीन परिस्थितीत प्रचंड ताण येतो. यासाठी श्रीरामपूर जिल्हा करणे हा जनहिताचा निर्णय ठरेल.
देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुका स्थापनेमुळे राहुरी तालुक्यातील दुर्लक्षित ३२ गावांना विकासाचा लाभ मिळेल. नविन तालुक्यामुळे औद्योगिक व रोजगारवाढीस चालना मिळेल. सन १९८२ साली स्थापन झालेल्या देवळाली-प्रवरा नगर परिषदेला आजपर्यंत तालुका दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे सामान्य जनतेवर घरपट्टी, पाणीपट्टीचा आर्थिक बोजा वाढला आहे.
राजेंद्र लांडगे म्हणाले, “श्रीरामपूर जिल्हा व देवळाली-श्रीशिवाजीनगर तालुका निर्माण हा ऐतिहासिक व दूरदृष्टीचा निर्णय ठरेल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जनतेमध्ये आशेचे आणि आनंदाचे वातावरण आहे.”