“पवित्र मरीयेसारखे प्रेषित व्हा” – फा. सावियो फर्नांडीस
मतमाउली यात्रापूर्व चौथा नोव्हेना शनिवार भक्तीभावात संपन्न

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तेरेजा चर्च, मतमाउली भक्तिस्थान, हरिगाव येथे यात्रापूर्व चौथ्या शनिवारच्या नोव्हेनामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या श्रद्धेची साक्ष दिली. या शुभ प्रसंगी “पवित्र मरिया – प्रेषितांची राणी” या विषयावर प्रवचन करताना रे. फा. सावियो फर्नांडीस यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
प्रेषित म्हणजे कोण? याचे स्पष्टीकरण देताना फा. सावियो म्हणाले, “प्रेषित म्हणजे देवाच्या कार्यासाठी देवाने पाठवलेला दूत. संत पेत्रस, संत पॉल, संत थोमस, फ्रान्सिस झेवियर यांसारख्या थोर प्रेषितांनी देवाच्या कृपेने जगभर चमत्कार घडवले. पण त्याहीपेक्षा मरीया ही प्रेषितांची राणी आहे, कारण ती पूर्णतः देवाच्या इच्छेप्रमाणे जगली.”
“पवित्र मरीया ही येशू जवळ राहिली, प्रार्थनेत राहिली आणि देवाची कृपा आपल्या जीवनात साकारली,” असे म्हणत त्यांनी भाविकांना प्रेरित केले की, “आपण सर्व ख्रिस्तीही देवाच्या प्रेषित आहोत. आपले जीवन म्हणजे येशू ख्रिस्ताची साक्ष. देवाला प्रथम स्थान देणे आणि त्याच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे हेच खरे प्रेषिताचे लक्षण आहे.”
प्रेषित होण्यासाठी कोणत्याही चमत्कारांची आवश्यकता नाही, तर देवाजवळ राहून प्रार्थनेत सहभागी होणे, प्रेमाने सेवा करणे आणि विश्वासाने जीवन जगणे – हेच खरे प्रेषितत्व असल्याचा संदेश त्यांनी दिला. “आपण मरीयेसारखे प्रेषित व्हावे, तिच्या नितळ श्रद्धेने, समर्पणाने आणि कृपेने भरलेले जीवन जगावे,” असा भावनिक आणि आत्मिक संदेश त्यांनी सर्वांना दिला.
या भावमय नोव्हेनामध्ये सेक्रेड हार्ट चर्च, सोनगाव व संत जोसेफ चर्च, पानोडी येथील धर्मगुरूंसह विविध धर्मसंघातील पाद्री, धर्मभगिनी उपस्थित होते. विशेषतः रे. फा. नेविल फर्नांडीस, फा. रॉनी परेरा, फा. विल्सन रुमाव, फा. जस्टीन, सिस्टर शैला रोझारिओ, सिस्टर व्हिनी यांचा सहभाग लक्षणीय ठरला. स्थानिक धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज यांच्यासह सर्वांनी एकत्र मिस्सा साजरी करत भाविकांसाठी विशेष प्रार्थना केली.