लोहार समाजाच्या संघर्षाला यश! आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित – समाजाच्या प्रयत्नांना मिळाली फळं

राहुरी (प्रतिनिधी): लोहार समाजाच्या तरुणांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या अथक संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाल्याची अधिकृत माहिती शासनाकडून मिळाल्यानंतर समाजात आनंदाचे वातावरण आहे.
या यशस्वी कार्यासाठी अनेक टप्प्यांत प्रयत्न करण्यात आले. दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी झालेल्या मायक्रो ओबीसी बैठकीत लोहार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. हे निवेदन ओबीसी आयोगाचे अध्यक्ष नामदार हंसराज अहिर यांच्याकडे सादर करण्यात आले.
त्यानंतर दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महामंडळास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला. मात्र, एक महिन्यानंतरही महामंडळ कार्यान्वित न झाल्याने पुन्हा एकदा 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन सादर करण्यात आले.
याच प्रयत्नांच्या पुढच्या टप्प्यात, 6 डिसेंबर 2024 रोजी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांना ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर 30 जून 2025 रोजी मुंबई मंत्रालयात जाऊन, दिलेल्या मागण्या आणि मागील निवेदनांवर कार्यवाही झाली की नाही याची माहिती मागवण्यात आली.
मुख्यमंत्री सचिवालयाने या संदर्भातील निवेदन इतर मागास (VJNT) विभागाकडे क्रमांक 78/23/149 ने पाठवल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पत्रकार शिवाजी दवणे, पत्रकार गणेश भालके, आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कौसे यांनी विभागाशी थेट भेट घेतली. त्यावेळी शासनाकडून “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज लोहार आर्थिक विकास महामंडळ” कार्यान्वित झाल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले.
या यशामध्ये अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, संग्राम भैय्या जगताप, अमोल खताळ, खासदार निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि आमदार अंबादास दानवे आदी मान्यवरांनी शिफारस पत्राद्वारे समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.
या प्रवासात सतत मार्गदर्शन करणारे प्रभाकर लाड सर, समाजहितासाठी कार्यरत असलेले रामलिंग कांबळे, समाजसेवक दत्ताभाऊ कौसे, पत्रकार गणेश भालके, तर लोहार समाजाच्या बातम्या आणि कार्यवाहिनी समाजापर्यंत पोहोचवणारे शिवाजी दवणे यांचे विशेष योगदान आहे.
हा ऐतिहासिक विजय संपूर्ण लोहार समाजाचा आहे. सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती व आत्मसन्मानासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामुळे प्रेरणा मिळेल. यापुढील काळात या महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.