अहिल्यानगर

मतदार यादीतील गोंधळामुळे बोगस मतदानाला खतपाणी? – काँग्रेसचे सचिन आहेर यांचे प्रशासनाकडे निवेदन

अहिल्यानगर | दादासाहेब पवार – शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुहेरी नोंदी, तसेच विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीर नावनोंदणीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या गंभीर प्रकाराविरोधात काँग्रेसचे युवा नेते आणि लोणी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उर्फ मुन्ना राजेंद्र आहेर यांनी पुढाकार घेत तहसीलदार राहाता यांच्याकडे निवेदन सादर केले असून, जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत तक्रार पोस्टाद्वारे पाठवली आहे.

आहेर यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील निवडणुकांपासून मतदार याद्यांमध्ये अनेक व्यक्तींची नावे दोन ते तीन वेळा, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये अशा दुहेरी नोंदींचा गैरफायदा घेत बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, प्रवरा परिसरातील काही महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे त्या गावातील मतदार यादीत नोंदवण्यात आली असून, त्याच वेळेस त्यांच्या मूळ गावीही ही नावे कायम ठेवण्यात आली आहेत. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हतेवर आघात करणारा असून, संभाव्य राजकीय गैरवापरास कारणीभूत ठरू शकतो, असेही आहेर यांनी निदर्शनास आणले.

या संदर्भात संबंधित BLO (Booth Level Officer) आणि ERO (Electoral Registration Officer) यांच्याकडून तात्काळ तपासणी करून चुकीच्या नोंदींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. काही दुहेरी नावांच्या छायाप्रती देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आल्या आहेत.

सचिन आहेर हे कै. राजेंद्र माधवराव आहेर पाटील यांचे सुपुत्र असून, स्व. आहेर पाटील हे लोणी खुर्द येथील कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून परिचित होते. सचिन आहेर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, तरुण मतदारांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव आहे.

“मतदार यादी ही पारदर्शक, अचूक व बोगस नोंदींपासून मुक्त असणे ही लोकशाहीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत,” अशी ठाम मागणी आहेर यांनी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button