शासनाने तात्काळ कर्जमाफी करावी; शेतकऱ्यांनी ‘सातबारा कोरा’ यात्रेत सामील व्हावे – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी (प्रतिनिधी) – कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी हैराण झालेला महाराष्ट्रातील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. स्वतःच्या कुटुंबाचीही मूलभूत गरज भागवताना तो हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची आश्वासने त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष, शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.
माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांनी मागील महिन्यात संत तुकडोजी महाराज समाधी स्थळ मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन करत सरकारला जाग आणली होती. त्या वेळी सरकारने कर्जमाफीबाबत आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने ते पूर्ण न केल्याने आता बच्चुभाऊ कडु यांच्या नेतृत्वाखाली ‘सातबारा कोरा कोरा कोरा’ ही भव्य पदयात्रा ७ जुलैपासून सुरू होत आहे.
ही १३८ किलोमीटरची पदयात्रा डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पाबळ (जिल्हा अमरावती) येथून प्रारंभ होईल आणि महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या करणारे कै. साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण (जिल्हा यवतमाळ) या गावात समारोप होणार आहे.
शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छीमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्यायहक्कासाठी ही यात्रा घेतली जात आहे. “जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम इशारा बच्चुभाऊ कडु यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
या आंदोलनात पक्ष, जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपल्या न्यायहक्कांसाठी एकत्र यावे, असे आवाहन सुरेशराव लांबे पाटील यांनी केले आहे. “राहुरी तालुक्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होऊन बच्चुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपला हक्क मिळवावा,” अशी विनंतीही त्यांनी केली.