७/१२ दुरुस्तीप्रकरणी शेतकऱ्यांची व्यथा अखेर ऐकली; क्रांतीसेनेच्या इशाऱ्याने प्रशासनाचे डोळे उघडले

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी ७/१२ उताऱ्यावरील चुकीच्या नोंदीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हैराण झाले असताना, अखेर क्रांतीसेनेच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला जाग येऊन हालचाली सुरू झाल्या आहेत. कलम १५५ व ८५ अंतर्गत करण्यात येणाऱ्या दुरुस्तीप्रकरणांतील रखडलेल्या अर्जांवर निर्णय न झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते.
हिरडगाव येथील शेतकरी नाना गुलाब दरेकर व भाऊसाहेब विठ्ठल भुजबळ यांनी १८ मे २०२३ रोजी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वर्षभरानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार, कर्जप्रक्रिया व पीकविमा दावे अडचणीत आले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रासही सहन करावा लागत होता.
या अन्यायाविरोधात क्रांतीसेनेचे जिल्हा प्रमुख सुभाष दरेकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन प्रभारी तहसीलदारांची भेट घेतली आणि प्रशासनाला १५ जुलै २०२५ पर्यंत सर्व प्रलंबित दुरुस्ती प्रकरणे निकाली काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.
क्रांतीसेनेच्या या स्पष्ट भूमिकेनंतर तहसील कार्यालयाने तत्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. सदर शेतकऱ्यांना सुनावणीसाठी तारीख देत नोटीस पाठविण्यात आल्या असून, प्रकरणात गती आल्याचे चित्र दिसत आहे.