डॉ. अमरनाथ जगदाळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न
विद्यार्थी घडवणारे, अंधश्रद्धा निवारणाचे कार्य करणारे शिक्षणतज्ञ सन्मानित

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) – रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अमरनाथ जगदाळे हे ३१ मे रोजी आपल्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थ्यांचे घडवलेले भविष्य, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व शैक्षणिक क्षेत्रात केलेले योगदान स्मरणात राहावे असेच आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने बोरावके महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. रयत शिक्षण संस्था व रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूरच्या प्रमुख मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. राजीव शिंदे, किशोर पाटील, डॉ. निशांत जगदाळे, मैथिली जगदाळे, डॉ. शरद शेळके आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. जगदाळे यांच्या शैक्षणिक सेवेला उजाळा देत त्यांचे भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सपत्नीक सत्कार मीनाताई जगधने व अनुराधा आदिक यांनी केला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. योगिता रांधवणे व डॉ. प्रियांका शितोळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अनुप दळवी यांनी केले.
कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेतील सहकारी, विद्यार्थी, कुटुंबीय आणि स्नेही यांनी उपस्थित राहून डॉ. अमरनाथ जगदाळे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. एक आदर्श शिक्षक, शिस्तप्रिय उपप्राचार्य आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख कायम राहणार आहे.