शिक्षणवारी ज्ञान पंढरी

पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा

स्पर्धा परीक्षेसाठी बालवयातच तयार होण्याचे आवाहन

राहुरी – “आपण स्पर्धेच्या युगात वावरत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी,” असे प्रतिपादन प्रहारचे अध्यक्ष व माजी सरपंच सुरेशराव लांबे यांनी केले. ते पिंपरी अवघड (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

दि. १६ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात प्रभात फेरीने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि शूज वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक, सरपंच बापूसाहेब पटारे, माजी सरपंच सौ. परविनबानो शेख, समिती अध्यक्ष सौ. योगिता लांबे, सदस्य जालिंदर पवार, विजय पवार, सौ. सुलताना पठाण, सौ. सोनाली उमाप, बद्रीनाथ लांबे, सनी पटारे, दादासाहेब लांबे, ढोकणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत शिक्षक शिवाजी नवाळे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर जवरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कल्हापुरे तर आभार प्रदर्शन श्री. पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रवेशोत्सवात पहिलीत प्रवेश घेतलेल्या २३ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण वातावरण आनंदमय व प्रेरणादायी ठरले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button