अहिल्यानगर

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण: CID तपासाची मागणी, आंदोलनाचा इशारा

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना बुधवारी, दि. २६ मार्च रोजी घडली असून, या कृत्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

या संदर्भात मराठा समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबरमे यांना निवेदन देण्यात आले. मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. अद्यापही पोलिस प्रशासन संबंधित आरोपींपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तातडीने गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवावा आणि आरोपींना त्वरित अटक करावी.”

तपासाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास, मराठा एकीकरण समिती, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या वेळी राजूभाऊ शेटे, सचिन म्हसे, नितीन तनपुरे, अशोक कदम, प्रवीण देशमुख, सतीश घुले, प्रवीण तनपुरे, ईश्वर गाडे, देवेंद्र जाधव, विजय कोकडे, कांता तनपुरे, बापूसाहेब काळे, सागर ताकटे आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button