महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहाराचा आरोप; तक्रारदाराचा आमरण उपोषणाचा इशारा

राहुरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड ऑफिसर वरिष्ठ श्रेणी, गट अ, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कुशाबापू पवार यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, योग्य ती कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पवार यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक 04/2021 अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत काही अपात्र उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीने पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांनी विशेषतः चार उमेदवारांची नावे पुढे करत त्यांच्या अनुभव प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात आयोगाने सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या नियमांची अंमलबजावणी केली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पवार यांनी यापूर्वीही विविध भरती प्रक्रियांमध्ये MPSC ने अपात्र उमेदवारांना निकालातून वगळले असल्याचे दाखले दिले. मात्र, या भरतीत तेच निकष लागू करण्यात आले नाहीत. त्यांनी भारतीय राज्यघटनेतील समान न्यायाचे तत्त्व (Equality Before Law) याचा हवाला देत, अपात्र उमेदवारांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, श्रीमती पूजा दिलीपराव खेडकर (IAS) यांच्या विरुद्ध UPSC ने केलेल्या त्वरित कारवाईप्रमाणेच MPSC नेही तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांत निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण
पवार यांनी MPSC अध्यक्ष, सदस्य, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून सात दिवसांत योग्य कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा, या अन्यायाविरोधात ते आमरण उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उमेदवारांमध्ये या प्रकरणाची दखल घेतली जाईल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.