महात्मा फुले कृषि विद्यापीठ नव्या उंचीवर घेवून जावू – कुलगुरु डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव चांगला आहे. येथील कामाचे वातावरण चांगले असून विद्यापीठाची प्रगती कशी होईल हे पाहण्याबरोबरच विद्यापीठ सर्व दृष्टीने सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु. कार्यालयीन काम करतांना सकारात्मकता, कामाचा दृष्टीकोन, ज्ञान व समर्पणाची भावना महत्वाची असते. त्यासाठी सर्वांना बरोबर घेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करु. महात्मा फुले कृषि विद्यापीठ नव्या उंचीवर घेवून जावू असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. पंजाबराब देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितिन दानवले, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, हाळगाव येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, अकोला कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितिन कोष्टी, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती विजयाताई आंबाडे व कृषिभुषण सुरसिंग पवार उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शरद गडाख आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, अकोला विद्यापीठामध्ये कुलगुरु म्हणुन काम करत असताना तेथील अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेवून तसेच अधिकच्या जबाबदार्या देवून काम केल्याचे फळ आज दिसत आहे. यावर्षी 3 हजार एकर क्षेत्रावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविल्यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात 40 कोटींपर्यंत वाढ झालेली आहे. सोयाबीन तसेच हरभरा या पिकांची उत्पादकता चार पटीने वाढली. शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांमध्ये मॉडेल व्हिलेजची संपल्पना राबविल्यामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.
यावेळी डॉ. साताप्पा खरबडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यापीठाला तसेच पाच महाविद्यालयांना नुकतेच ‘अ’ मानांकन मिळाले असून उर्वरीत मालेगांव, कराड, मुक्ताईनगर व हाळगांव या कृषि महाविद्यालयांना ‘अ’ मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वात कृषि शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील. डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मनोगतात म्हणाले की, कुलगुरु डॉ. गडाख यांच्या संकल्पनेनुसार विस्तार कार्य करताना मॉडेल व्हिलेजसारखी संकल्पना राबविण्याबरोबरच बियाण्यांच्या बाबतीत शेतकर्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी बियाणे व्हिलेजची संकल्पना राबवावी लागेल. कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन व विस्ताराला नवी दिशा मिळेल.
डॉ. विठ्ठल शिर्के यावेळी म्हणाले की कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी कुलगुरु म्हणुन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात केलेल्या कामाची दखल घेवून राज्यपाल महोदयांनी त्यांची निवड राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली आहे. कुलगुरु डॉ. शरद गडाख राहुरी विद्यापीठामध्ये काम करताना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून विद्यापीठाचे नाव नक्कीच मोठे करतील.
याप्रसंगी मिलिंद ढोके, डॉ. रविंद्र बनसोड, डॉ. किशोर बिडवे, सुरसिंग पवार, श्रीमती विजयाताई आंबाडे व अहिल्यानगर येथील खते बि बियाणे असोशिएशनचे सचिव दिलीप कोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन दानवले यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुलेंच्या प्रतीमेचे पुजन करुन व दिवंगत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून व श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.