बनावट अनुभव प्रमाणपत्र प्रकरणी तात्काळ चौकशीची मागणी

राहुरी – अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या नगरपरिषदांनी नोकर भरती प्रक्रियेसाठी वर्क वेल इन्फोटेक कंपनीकडून दिलेल्या अनुभव प्रमाणपत्रांबाबत मोठा खुलासा झाला आहे. संबंधित प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी केली आहे.
पुणे येथील सहकार आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना मुंबई, पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग वरळी तसेच जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अमरावती, सातारा यांच्याकडे करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्रांमुळे बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असून, या गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच, वर्क वेल इन्फोटेक कंपनीने अहमदनगर, सातारा, भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही भरती प्रक्रियेचे काम हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही तात्काळ चौकशी करून संबंधित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. तपासात कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.