शिक्षणवारी ज्ञान पंढरी

विद्यार्थ्यांनी चाकोरी बाह्य नवीन क्षेत्राचा विचार केल्यास यश निश्चित – मिरवणकर

संशोधन शिष्यवृत्तीत यशोधन मिरवणकर भारतात तिसरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांनो चाकोरी बाह्य नवीन क्षेत्राचा विचार करावा त्यामुळे आपल्याला यश निश्चित मिळते असे मत यशोधन मिरवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

माजी प्राचार्य कै. शंकरराव कडू यांचा नातू व डॉ.सुनिता कडू मिरवणकर यांचा मुलगा इंजिनीयर यशोधन मिरवणकर याने उच्चतम शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार अधिनस्थ यूजीसी नेट स्थापित स्वायत्त संस्था राष्ट्रीय परीक्षा एजन्सी द्वारे यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये सामरिक शास्त्र व धोरणात्मक अभ्यास या विषयात 99.90 पर्सेंटाइल इतके गुण मिळवून भारतात पहिल्या तीन क्रमांकात येऊन जूनियर रिसर्च फेलोशिप ( संशोधन शिष्यवृत्ती )मिळवून अभिमानास्पद यश संपादन केले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिमान अभिनंदन होत आहे.

शालेय स्तरापासून शैक्षणिक प्रगतीचा आलेख कायम ठेवून इयत्ता बारावी शास्त्र इंग्रजी माध्यम मध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअर पदवी घेताना सलग पाच सेमिस्टर दहा पैकी दहा एस जी पी ए मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर खुल्या प्रवर्गातून चुरशीच्या प्रवेश परीक्षेत यश मिळवत देशपातळीवर पाचव्या क्रमांकावर येत सामरिक शास्त्र या विषयाच्या एम एस सी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. अत्यंत कठीण व चाकोरी बाह्य व आवाहनात्मक अशा दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात 7.6 सी जी पी ए मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली.

दरम्यानच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील जर्नल ऑफ सोशल अँड स्ट्रॅटेजीक स्टडीज मध्ये यशोधन याचा भारत चीन सागरी तांत्रिक माहिती तुलनात्मक आढावा हा प्रबंध प्रकाशित झाला. हे सर्व यश संपादन करीत असताना यशोधन याने इयत्ता दहावी ते आजपर्यंत कुठलाही कोचिंग क्लास लावला नाही. आवडीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचे दडपण येत नाही तसेच महागड्या कोचिंग क्लासची आवश्यकता भासत नाही.

एखादा छंद जोपासल्याप्रमाणे शिक्षणाचा आनंद घेता येतो. तसेच चाकोरी बाहेर जाऊन नवीन क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी अनेक करिअरच्या वाटा उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये आजही विषय तज्ञांची कमतरता आहे. तरुण विद्यार्थ्यांनी चाकोरी बाह्य नवीन क्षेत्राचा विचार करावा, यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया यशोधन मिरवणकर यांनी दिली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button