इपीएस ९५ पेन्शनवाढीचा प्रश्न लवकर मार्गी लागणार – कामगार मंत्री मांडवीया

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शनधारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पेन्शनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे स्पष्ट आश्वासन कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी दु. २.३० वा. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत दिले. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवेळी त्यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी दिली.
बैठकीस राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत, राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा तसेच पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर उपस्थित होते. या चर्चेत पेन्शनवाढीबरोबरच पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा आणि उच्च पेन्शन अर्जांवरील त्रुटींविषयी सकारात्मक चर्चा झाली. मंत्री मांडवीया यांनी सांगितले की, “तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. तुमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असून त्याचा मला अभिमान आहे. विविध मतप्रणाली बाजूला ठेवून मी तुमचे काम निश्चित करतो.”
केंद्र सरकारच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पेन्शनवाढीबाबत कोणतीही घोषणा न झाल्यामुळे देशभरातील पेन्शनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील २० खासदारांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडला. मागील १० वर्षांपासून शांततेच्या मार्गाने न्यूनतम पेन्शनवाढीसाठी ७८ लाख पेन्शनधारकांनी विविध आंदोलने केली. अखेर, त्यांच्या मागण्यांची दखल घेत कामगार मंत्री मांडवीया यांनी पेन्शनवाढ निश्चित असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.