अयोध्यात श्रीरामाच्या दर्शनासह श्री विठ्ठल-रुक्मिणीचेही दर्शन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामाची पावनभूमी असून येथे विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येते. प्रभू श्रीराम, भरत यांसह अनेक देवतांची मंदिरे येथे स्थित आहेत. भाविक अयोध्या नगरीत प्रवेश करताच प्रथम पवित्र शरयू नदीवर स्नान करून दर्शनाची सुरुवात करतात. त्यानंतर हनुमान गढी या प्रसिद्ध मंदिरात हनुमानजींचे दर्शन होते. या मंदिराच्या शेजारीच दशरथ महाल स्थित आहे, जिथे आता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारले जात आहे.
या नव्याने उभारल्या जाणाऱ्या मंदिरात एक विशाल हॉल साकारला जात असून, तेथे कीर्तन, हरिपाठ, पारायण, तुकाराम गाथा, रामायण यांसारखे धार्मिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जात आहेत. महाराष्ट्रातील भाविकांसाठी हे स्थान भक्तिरसात न्हालेल्या एका अनोख्या अनुभवाचे ठिकाण ठरणार आहे.
दशरथ महाल हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले स्थान असून, यालाच ब्रह्मदेवाची राजगादी म्हटले जाते. येथे ४० वे श्रीराम हे वंशज आहेत. प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांना चक्रवर्ती राजाचा सन्मान मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती, म्हणूनच दशरथ महालाचे विशेष महत्त्व आहे. कुंभमेळ्यात आलेल्या अनेक भाविकांनी येथे दर्शन घेतले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील कानिफनाथ ढेरे (कृष्णबिहारीदास) हे या मंदिराच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्नशील आहेत. त्यांना अयोध्या येथे मोठे महंत देवेंद्रप्रसाद आचार्य यांची भेट झाली. संतांच्या आशीर्वादाने त्यांना येथे जागा प्राप्त झाली आणि मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाली.
या नव्या मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या सोबत संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर प्रमाणेच येथेही भक्तांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. महाराष्ट्रातील भाविकांनी अयोध्या दौर्यादरम्यान हनुमान गढी जवळील या मंदिरास अवश्य भेट द्यावी. तसेच दिंडीसह याठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल.
सध्या या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांसाठी अयोध्येत एक नवे श्रद्धास्थान निर्माण झाले आहे. प्रसिद्ध पत्रकार बी. आर. चेडे यांनी अयोध्या भेटीदरम्यान कानिफनाथ ढेरे (कृष्णबिहारीदास) यांची भेट घेतली आणि श्रीराम तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. सरला बेटावरील अनेक भाविकांनीही येथे दर्शन घेतले आहे. महाराष्ट्रातील भाविकांनी अयोध्या दौर्यात हनुमान गढी शेजारील दशरथ महालाजवळील या मंदिराला नक्कीच भेट द्यावी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.