आकारी पडित शेतकऱ्यांचा एल्गार – न्याय मिळाल्याशिवाय जमिनी वाटपास विरोध
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे): तालुक्यातील आकारी पडित शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या बेकायदेशीर निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. शेती महामंडळाच्या मालकीच्या हरेगाव येथील गट क्रमांक ३ मधील आठ हेक्टर जमीन ग्रामपंचायतीस सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याच्या शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत आज सकाळी शेतकऱ्यांनी सरकारी मोजणी रोखली.
शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत प्रथम आकारी पडितांना जमिनी वाटप करणे गरजेचे आहे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. या संदर्भात दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले होते.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सांगितले की, “गेल्या सात-आठ वर्षांपासून हा लढा न्यायालयात सुरू आहे. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उच्च न्यायालयाने आकारी पडितांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात द्याव्यात असा आदेश दिला होता. मात्र, शासनाने तो आदेश पाळलेला नाही. उलटपक्षी, आमच्या जमिनी अन्य सार्वजनिक कामांसाठी देण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सुरू आहे. आम्ही याला कडाडून विरोध करू.”
यावेळी उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी शासनाच्या या भूमिकेविरोधात घोषणा देत सरकारी मोजणी रोखली. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज घेत शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून आंदोलक शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या.
आकारी पडित शेतकऱ्यांचा पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंदीरगाव येथे लवकरच मेळावा आयोजित केला जाणार आहे.
या आंदोलनात अनिल औताडे, ॲड. सर्जेराव घोडे, सागर गिऱ्हे, साहेबराव चोरमल, गोविंदराव वाघ, बाबासाहेब वेताळ, सुनील आसने, सचिन वेताळ, सोन्याबापू नाईक, बबनराव नाईक, शरद आसने, शालनताई झुरळे, जितेंद्र चांदगुडे, गंगाराम वेताळ आदी शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.