कृषी

जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज – मृदविज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे

राहुरी विद्यापीठ : भारतीय संस्कृतीमध्ये मातीला खूप महत्त्व आहे. आपल्या मूलभूत गरजा पुरविण्याची क्षमता मातीमध्ये असून आता तिची क्षमता पूर्वीसारखी राहिली नाही. भरमसाठ रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची जडणघडण बिघडली आहे. त्यामुळे जमिनीतील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले जिवाणू नष्ट होऊन पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीचा सर्वांगीण विकास होण्याकरिता व जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मृद विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मृद विज्ञान विभाग व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मृदा दिनाचे आयोजन राहुरी तालुक्यातील सडे येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद धोंडे यांच्या शेतावर करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. भीमराव कांबळे बोलत होते. याप्रसंगी आंतरविद्या जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, मृदविज्ञान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. रितू ठाकरे, डॉ. श्रीगणेश शेळके, डॉ. देविदास खेडकर, डॉ. संजय तोडमल, डॉ. सुभाष घोडके, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्रीमती कांचन तागड, श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक दादासाहेब धोंडे व राहुरीचे तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले की 2024 या वर्षाची मृदा दिनाची संकल्पना मातीची काळजी मापन निरीक्षण व व्यवस्थापन अशी आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रथम माती व पाणी करून खते देणे गरजेचे आहे. नापीक जमीन सुपीक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून जागतिक मृदा दिन साजरा करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. अनिल दुरगुडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की माती, पाणी, हवा ही नैसर्गिक संसाधने असून त्यातील माती ही आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. मातीमधूनच आपल्याला पाणी तसेच विविध अन्नद्रव्य मिळतात. दरवर्षी पावसाळ्यात प्रती हेक्टर 16 टन माती वाहून जाते. या वाहून जाणार्या पाण्याबरोबर जमिनीतील खते, जिवाणू व कर्बाचा समावेश होतो. माती जगविण्यासाठी आपल्याला दूरदृष्टी ठेवणे गरजेचे असून मातीचा आत्मा असलेला कर्ब वाढविण्यासाठी माती परीक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कडधान्यासारख्या पिकांचे अवशेष शेतातच गाडणे, शेणखताचा जास्तीत जास्त वापर करणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. माती परीक्षण केल्यामुळे जमीन क्षारयुक्त आहे की चोपण आहे ते ओळखता येते, त्यावर उपाययोजना करावी. चोपण तसेच 8.5 पेक्षा जास्त पी.एच. असणार्या जमिनीतच मळीचा उपयोग करावा. अभ्यास करून पिकांची निवड तसेच पाण्याचे योग्य नियोजन व जमिनीची मशागत व्यवस्थित केले तर किडींचे व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित होते. मृदा आरोग्य पत्रिकांचा वापर करून खतांचे व्यवस्थापन व वेळेवर पेरणी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे यावेळी ते म्हणाले.

श्री. गोसावी यांनी यावेळी कृषि विभागामार्फत सडे गावामध्ये घेतलेल्या उसामध्ये मूग व मटकी या प्रात्यक्षिकांबद्दल माहिती दिली. डॉ. रितू ठाकरे प्रास्ताविक करतांना म्हणाल्या की शेतकर्यांनी रासायनिक व सेंद्रिय खते यांची जोड देऊन व्यवस्थापन करावे. जमीन जिवंत आहे, तिचे मापन, निरीक्षण करता आले पाहिजे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा तसेच जिवाणू खतांचा योग्य वापर करावा, जेणेकरून उत्पन्न वाढ होऊन जमिनीतील कर्ब वाढेल. यावेळी वांबोरी येथील वाल्मिकी ऍग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या वाल्मिकी सडे झोन-1 या सेंद्रिय गटाचे अध्यक्ष आशुतोष धोंडे यांनी सडे गावात घेतलेल्या सेंद्रिय प्रात्यक्षिकांची माहिती दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बाळासाहेब गवते, शिवाजी धामोरे, पंडित साळुंखे, हरून पठाण व प्रमोद धोंडे या शेतकर्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रकाश धोंडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक श्रीमती पल्लवी ढोकचौळे व श्रीमती उषा गावडे यांनी विशेष प्रयत्न केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button