ठळक बातम्या

राहुरी मतदारसंघात विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क कर्डिलेंना विजयाच्या दिशेने नेणार!

प्रचारादरम्यान गावोगावी मिळतोय मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरी | अक्षय करपे : राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदा भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात सरळ लढत होत आहे. महायुती व मविआमधील या थेट लढतीत प्रचाराला वेग आला आहे. कर्डिले यांनी मागील निवडणुकीतील पराभव पुसुन काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. राहुरी तालुक्यात त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करून तनपुरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांना भाजपमध्ये आणले आहे.

या मतदारसंघात नगर तालुका व पाथर्डी तालुक्यातील गावांचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यात कर्डिले यांचे राजकीय वजन अधिक आहे. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम कर्डिलेंच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. याशिवाय मागील निवडणुकीत तनपुरेंसाठी ताकद लावणारे ज्येष्ठ नेते स्व.शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे यावेळी कर्डिलेंसाठी ताकद लावत आहेत. त्यामुळे यंदा मतदारसंघात मोठा राजकीय बदल पहायला मिळत आहे.

पाच टर्म आमदार म्हणून विजयी झालेल्या कर्डिले यांच्या घोडदौडीला सन २०१९ च्या निवडणुकीत ब्रेक लागला. मात्र पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम राखला. दररोजच्या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जिल्हा बँकेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी चांगल्या योजना राबविल्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विशेष योजना आणून दुध उत्पादकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला.

राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन होऊन भाजप महायुतीचे सरकार आले. राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून कर्डिले यांनी मतदारसंघातील गावागावात विकासकामे करण्यावर भर दिला. वांबोरी चारीचा विषय मार्गी लावण्यात त्यांना यश आले. याशिवाय राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजना, शेतकरी सन्मान योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी सक्षमपणे योगदान दिले.

दहा वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे समोर ठेवून कर्डिले पुन्हा एकदा मतदानाचे आवाहन करीत आहेत. याशिवाय भाजप महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळेही ग्रामीण भागात भाजपला असलेले अनुकूल वातावरण कर्डिले यांच्या पथ्यावर पडू शकते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः राहुरी मतदारसंघात लक्ष घालत पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नव्या सरकारमध्ये कर्डिले यांना मंत्रिपदाची संधी…

राहुरी मतदारसंघात यंदा कर्डिले यांनी विजय मिळवला आणि राज्यात महायुतीचे सरकार आले तर कर्डिले यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा मतदारसंघात आहे. कर्डिले यांचा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सूर जुळलेले आहेत. भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांच्याशी असलेले चांगले संबंध त्यांना राहुरी, नगर, पाथर्डी भागात मुंडे समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवून देऊ शकतात.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button