प्रा.डॉ. पवारांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य प्रेरणादायी- प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे
श्रीरामपूर : महात्मा गांधी, कर्मवीर अण्णा, साने गुरुजी, डॉ. बाबा आमटे इत्यादिंचा आदर्श समोर ठेवून प्रा.डॉ. कैलास पवार यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्य सुरु असून ते आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे विचार माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.
येथील मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात प्रा.डॉ कैलास पवार यांचा विविध संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेह परिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या सेवाभावी कार्याचा परिचय करून दिला. प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सुखदेव सुकळे, प्रा.शिवाजीराव बारगळ, आरोग्यमित्र भीमराज बागूल, पत्रकार बाबासाहेब चेडे आदिंनी प्रा.डॉ. कैलास पवार यांचा सत्कार केला.
प्रा. पवार यांना नुकतीच वर्धा येथील महात्मा गांधी सेवाग्राम शांती भवनमध्ये सेवाभावी कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा समितीतर्फे मानव मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले, तसेच महांकाळ वाडगाव येथील संतगड दर्शन आश्रमात परमपूज्य श्रध्दानंदजी महाराज व ग्रामस्थांनी नागरी सन्मान केला, त्याबद्दल प्रा.डॉ. कैलास पवार आणि सौ. अनिता पवार यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, विविध पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले.
प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या विद्यार्थी अवस्थेतील खडतर जीवनाचे प्रसंग सांगून कमवा आणि शिका योजनेतून एका शेतकरी पुत्राने गरिबीशी झुंज देत शिक्षण घेऊन, निराधारांसाठी जीवन वाहून घेतले आहे, त्यामुळेच त्यांना लाभलेले सन्मान नव्या पिढीला स्फूर्तीप्रद असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागूल, सुखदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ. कैलास पवार यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक यांचे संस्कार व सहकार्य याविषयी आठवणी सांगून ०२ ऑक्टोबर २०१९ पासून भूमी फाऊंडेशनने राबविलेल्या विविध सेवाभावी प्रकल्पाची माहिती दिली.
प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेद्वारे प्रा.डॉ. पवार यांनी जे कार्य सुरु ठेवले आहे, त्यांची दखल आंतररष्ट्रीय महात्मा गांधी सेवा सामितीने घेतली, हे भूषणावह असल्याचे सांगितले. वाचन संरकृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे नेहमीच चांगल्या कार्याचा सन्मान करतात, त्याबद्दल कौतुक केले. यावेळी ईशान पवार, भाग्यशा पवार, प्रतीक जाधव, श्रेयस ठोंबरे, तेजल घोंडगे आदिंनी सहभाग घेतला. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून सूत्रसंचालन केले तर सौ. अनिता पवार यांनी आभार मानले.