ठळक बातम्या

स्व: पक्षाच्या दबावामुळे माघार – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी : चालू विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष व इतर मित्र पक्ष यांनी परिवर्तन महाशक्तीची स्थापना केल्याने राहुरीची जागा प्रहार जनशक्ती पक्षाला मिळेल ही अपेक्षा होती. परंतु ती जागा मित्र पक्षाला गेल्याने माझ्यावर अन्याय झाला, माझ्या अपक्ष उमेदवारीमुळे परिवर्तन महाशक्ती मधील मित्र पक्षातील नेत्यांनी माझ्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला व माझ्यावर प्रेमाचा दबाव टाकून माझी निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले अशी माहिती प्रहारचे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिली.

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्ष प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर विविध प्रकारे मोर्चे, आंदोलन करून शेतकरी व सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे नाव घराघरात पोहोच केले. अनेकांशी वैर पत्करले, स्वतः चे नुकसान केले. या सर्वांची तमा न बाळगता आजपर्यंत लढा दिला. तरीही पक्षाने माझ्या उमेदवारीचा कुठलाही विचार केला नाही व मित्र पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देतानाही मला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मी पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा आदर करत उमेदवारी अर्ज माघार घेतला. परंतु पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा शब्द दिला नाही. माझा कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी वैयक्तिक वाद नसून जो काही वाद आहे तो तत्वाचा वाद आहे. तो वाद जनहीतासाठीच आहे, माझा पाठिंबा जाहीर अटींवर असणार आहे.

या निवडणुकीतील जो उमेदवार राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेल्या संस्था चालू करेल. तसेच कष्टकरी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत पगार, ग्रॅज्युटी फंड देणे, तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवीन उद्योग एमआयडीसी, मुळा धरण व राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी, प्रत्येक गावात व वस्तीवर जाण्यासाठी रस्ते व ईतर या सर्व प्रश्नांवर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल व प्रलंबित प्रश्न सोडविणार्या उमेदवाराला या वरील अटींवर सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दोन दिवसांत उघड पाठिंबा दिला जाईल मग तो उमेदवार कोनीही असो. आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल असा विश्वास शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button