अपक्ष उमेदवार सुरेशराव लांबे यांनी घेतली मनोजदादा जरांगे पाटलांची भेट
स्व पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी करणार - सुरेशराव लांबे पाटील
राहुरी – प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या क्रमांकाने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दुसरा उमेदवारी अर्ज आमदार बच्चूभाऊ कडू व मित्रपक्ष यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन महाशक्ती कडून दाखल करण्याआधीच परिवर्तन महाशक्तीची राहुरीची उमेदवारी पक्षाशी व शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असलेले सुरेशराव लांबे यांना न देताच अन्य उमेदवाराला जाहीर केल्याने लांबे यांनी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी येथे समक्ष भेट घेऊन उमेदवारीसाठी पाठिंब्याची मागणी केली असता जरांगे पाटील यांनी चार दिवसानंतर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मनोज दादा जरांगे व अंतरवली सरपंच यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अशी माहिती अपक्ष उमेदवार सूर्यभान उर्फ सुरेशराव लांबे यांनी दिली.
पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले, 2024 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आमदार बच्चूभाऊ कडू व मित्र पक्षांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना केली. परंतु त्यांनीही इतर पक्षाप्रमाणे एकनिष्ठांना व शेतकऱ्यांची नाळ जोडलेल्या स्वतःच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी दुसऱ्यांनाच उमेदवारी दिली. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य मतदार जनता महायुती आणि महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळली असून त्यांना तिसरा पर्याय योग्य मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तिसऱ्या आघाडीतही परपक्षीय उमेदवारांना उमेदवारी दिल्याने तिसरा पर्याय मतदार स्वीकारणार नाही.
मला अनेक पक्ष संघटना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक असूनही मी स्व पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी भारत जगधने, नरेंद्र हिवाळे, सनी पटारे, बापूसाहेब मांडे, बनीभाऊ गाडेकर, तुकाराम आडसुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.