मराठवाडा

मनरेगा योजनेत पारदर्शकतेची गरज – क्रांतीसेना

आँनलाईन अर्ज स्वीकारून भारत पशुधन पोर्टलवरील माहितीच्या आधारे योजनेचा लाभ द्या

कळंब : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने मधून शेतकऱ्यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. या योजनेत पारदर्शकतेची गरज असून वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी च्या धर्तीवर आँनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून भारत पशुधन पोर्टलवरील माहितीच्या आधारे योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी धाराशिव जिल्हाध्यक्ष अमोल शेळके यांनी तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर महाराष्ट्र समृध्द” करण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहात. यातीलच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महाडीबीटीच्या धर्तीवर आँनलाईन पद्धतीने स्विकारण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात जातपात, पक्ष, राजकीय द्वेष त्यागून ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी आणि त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य केल्यास आदर्श ग्राम होण्यास वेळ लागणार नाही. परंतु बहुतेक ठिकाणी सरपंच व सदस्य आपली विचारसरणी सोडायला तयार नसल्याने नागरिकांना अनेक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याचेच उदाहरण म्हणून राज्यातील बर्याच खेडेगावातील ग्रामपंचायतीकडून गाय गोठा प्रकरणांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे जमा केले आहे. त्यातील काही अर्जदारांकडे गाय, म्हैस नसतानाही त्यांना पशुधन असलेचा पशुवैद्यकीय दाखला देऊन लाभ दिला जात आहे. त्यामुळे गरजवंत पशुपालक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही खेड्यापाड्यांचा विकास खुंटला आहे. यामुळे आपण राबवित असलेल्या योजनांचा देखील फज्जा उडाला आहे.

त्यामुळे तातडीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या सर्व योजनांची प्रक्रिया थांबवून गरजवंत पशुपालक शेतकऱ्यांना सदर योजनांचा लाभ मिळण्याबरोबरच या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील जनावरांची नोंदणी (Ear Tag) महाराष्ट्र राज्यात INAPH/ भारत पशुधन पोर्टलवर बंधनकारक करून भारत पशुधन पोर्टलवरील माहितीची चौकशी करूनच योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रवीण सदाफुले, बाळासाहेब शेळके, संजय पाटील आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button