मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना उद्योजिका बनविणार – प्रशांत लोखंडे
राहुरी | प्रतिनिधी – तालुक्यातील टाकळीमिया येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे, शेतकरी सेनेचे राज्य प्रमुख धनंजय जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सरपंच लीलाताई गायकवाड, सुवर्णा करपे, कवाने ताई, सुभाष जूंदरे, विजय तोडमल, जुगल गोसावी, शिंदे, बाळासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना युवा नेते प्रशांत लोखंडे म्हणाले की, महिलांनी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी ३५% सबसिडी तर शहरासाठी २५% सबसिडी आहे. महिलांनी शेती पूरक व्यवसायात प्राधान्याने उतरावे. ग्रामीण भागातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत असताना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधावा. तसेच महिलांनी छोट्या उद्योगातून तयार होणारी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल असेही लोखंडे म्हणाले. यावेळी सरपंच लिलाताई गायकवाड, शिवसेना महिला आघाडी ता.प्रमुख वनिताताई जाधव, सुभाष जुंदरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पायल बोबडे यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांच्या माध्यमातून अनेक महिलांना मोठी मदत झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.
शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले की, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लाडकी बहिण योजनेचा ज्या बहिणींनी लाभ घेतलेला नाही त्यांनी तात्काळ अर्ज करावा व योजनेचा लाभ घ्यावा. शासकीय योजनेचा लाभ घेताना कुठलीही अडचण भासल्यास शिवसैनिकांना संपर्क साधावा असे आवाहन लांबे केले.