कृषी

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे कार्य शेतकरीभिमुख – संशोधन संचालक डॉ. शिर्के

राहुरी विद्यापीठ : पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी ऊस तंत्रज्ञानाचे प्रवेशद्वार असून येथे ऊस पिकाविषयी सर्व समस्यांचे निराकरण होते. ऊस हे अतिशय महत्त्वाचे नगदी पीक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या संशोधन केंद्राचे कार्य प्रभावी व शेतकरीभिमुख असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे संशोधन केंद्र ऊस व साखर कारखानदारीमध्ये भरीव काम करत आहे. अशा राज्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या ऊस संशोधन केंद्राला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व नियंत्रक सदाशिव पाटील यांनी भेट देऊन संशोधन कार्याची माहिती घेतली त्यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. याप्रसंगी ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, मृदशास्त्र विभागातील डॉ. कैलास काळे, ऊस कीटकशास्त्रज्ञ डॉ. शालिग्राम गांगुर्डे, ऊस शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सदाशिव पाटील आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की आज राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रीय भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस हे नगदी पीक म्हणून घेण्याकडे वळलेला आहे. साखर कारखानदारीमुळे पश्चिम महाराष्ट्राबरोबरच इतर विभागातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हे ऊस संशोधन केंद्र शेतकरी व कारखानदार यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे केंद्र आहे. ऊस व साखर उत्पादन वाढीमध्ये राज्य व देशाच्या विकासामध्ये या संशोधन केंद्राच्या वाणांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. भविष्यात शेतकऱ्यांसाठी नवीन वाण संशोधन करून त्यांचे ऊस उत्पादन कसे वाढवता येईल यावर भर द्यावा असे त्यांनी सुचविले. यावेळी श्री. पाटील यांनी कार्यालयातील लेखा व आस्थापनाविषयी असलेल्या अडचणी व इतर विषयांवर चर्चा करून अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राजेंद्र भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या 17 सुधारित वाण व शाश्वत ऊस शेती व उत्पादन वाढीसाठी ऊस लागवडी संबंधीच्या किफायतशीर तंत्रज्ञानाच्या 109 पेक्षा जास्त शिफारशींची माहिती देऊन आजपर्यंत प्रसारित वाणामुळे देश आणि राज्याच्या गोड क्रांतीमध्ये असलेले योगदान विशद केले. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के व सदाशिव पाटील यांनी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी मान्यवरांनी संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगांना, ऊस बेणे मळ्यास तसेच या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणांच्या प्लॉटला भेट दिली. शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्याचे मूलभूत काम येथे होत असल्याने येथे भेट दिल्याने समाधान वाटले असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरज नलावडे यांनी तर आभार डॉ. सुरेश उबाळे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button