हरेगाव मतमाउली यात्रा आनंदाने संपन्न होईल – तहसीलदार वाघ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील ७६ वा मतमाउली यात्रा महोत्सव सर्वांच्या सहकार्याने आनंदात संपन्न होईल असे प्रतिपादन तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ यांनी केले.
येत्या १४ व १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतमाउली यात्रेच्या तयारीचा आढावा, समस्या तसेच यात्रा शांतता कमिटीप्रसंगी घ्यावयाची दक्षता नियोजन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्व ठिकाणचे सिसिटीव्ही चेक करावेत, पार्किंग घेणाऱ्याने सर्व जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अन्यथा कारवाई होईल. वीजपुरवठा सुरळीत राहील. महसूल विभागातील सर्वांचे सहकार्य राहील. यावेळी तहसीलदार वाघ, पोलीस निरीक्षक चौधरी, जमावबंदीचे देशमाने, चौरे, महसूल विभागाचे अरुण रणनवरे, मंडळ अधिकारी गवारे, तलाठी डहाळे, गटविकास अधिकारी रमजान शेख आदींनी चर्च परिसरात पाहणी केली.
श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सूचना केल्या की, परिसरात जेथे अंधार आहे त्या ठिकाणी अजून सीसीटीव्ही लावावेत म्हणजे गैरप्रकार होणार नाहीत. ब्राम्हणगाव फाटा येथे वाहन तळ पार्किंग व्यवस्था असल्याने तेथे लाईट नसतात, तेथे वीजपुरवठा उपलब्ध करावा तसेच चर्च ते खैरी रोडवर जेथे वाहतूक प्रवेश बंद ठेवल्या जाईल तेथपर्यंत विजेचे खांब टाकून लाईट व्यवस्था करावी. दुकानासाठी जागा दिल्यावर वाद होता कामा नये, पाळणे आदी लावताना विजेची दक्षता घ्यावी असे ग्रामपंचायत हरेगाव उंदीरगाव यांना सांगितले. आवश्यक ती व्यवस्था यात्रेपूर्वी करण्यात येईल तसेच भाविकांसाठी पिण्याचे पाणी पुरवठा मुबलक राहील. सर्वत्र सीसीटीव्ही चालू आहेत, असे संचालक वीरेश गलांडे व ग्रामसेवक डौले यांनी सांगितले.
हरेगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रदीप आसने यांनीही आवश्यक समस्या सोडविल्या जातील. सीसीटीव्ही वाढविणार असल्याचे सांगितले. चर्च परिसरात हॉटेल, दुकाने थाटली जातात व चर्चकडे जाणारा रस्ता गर्दीसाठी मोठा ठेवला जातो. परंतु रात्रीतून दुकाने पुढे सरकून रस्ता अपुरा करतात त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत येईल. भाविकांसाठी पोस्ट ऑफिस जवळ बस स्थानक राहील असे एसटीचे अमोल पटारे यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे मतमाउली यात्रेनिमित्त परिसरात फ्लेक्स बोर्ड लावण्यात ग्रामपंचायत उन्दिरगाव यांनी मनाई केली आहे. असे डौले यांनी सांगितले.
या शांतता कमिटीवेळी तहसीलदार मिलींदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक चौधरी, देशमाने, चौरे, प्रमुख धर्मगुरु फा.डॉमनिक रोझारिओ, महावितरणचे गमे, दिलीप त्रिभुवन, प्रिन्सिपल सि.ज्योती, हरिगाव, उन्दिरगाव ग्रामसेवक, संचालक वीरेश गलांडे, जितेंद्र गोलवड, विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे, उप अभियंता पिसे, अनिल भनगडे, मोहन खरात, डी एस गायकवाड, ज्यो दिवे, भीमराज बागुल, सुभाष बोधक, मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक बी जी पारधे यांनी, सूत्र संचालन फिलीप पंडित यांनी व आभार प्रदर्शन फा.फ्रान्सिस ओहोळ यांनी केले.