राहुरीतील अवैध व बेकायदेशीर धंद्यावर वचक बसण्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे – ॲड. पवार
राहुरी : गेल्या कित्येक दिवसांपासुन राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे चालु असुन याकडे राहुरी पोलीस कानाडोळा करीत असुन उलट या अवैध व बेकायदेशीर दोन नंबर धंदेवालेंना अभय देण्याचे काम करीत असल्याने आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी ॲड. भाऊसाहेब पवार यांच्यासह तालुक्यातील सामाजिक व राजकीय संघटनांनी केली आहे. यासंदर्भात राहुरी तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार दळवी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कित्येक गावात अवैध धंदे राजरोस सुरु असुन त्याकडे राहुरी पोलीस प्रशासन जाणुन बुजुन कानाडोळा करीत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात गावठी दारु, जुगार, मटका असे बेकायदेशीर धंदे बिनधास्तपणे सर्रास चालु असुन या अवैध धंदेवालेंविरोधात राहुरी पोलीस कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. यावरुन राहुरी पोलीसांचे अशा धंद्यांना अभय किंवा पाठबळ आहे का ? हा ही मोठा प्रश्न राहुरी तालुक्यातील जनतेत निर्माण झालेला आहे. इतकेच नव्हेतर राहुरी तालुक्यात चो-यामध्ये देखील फार मोठे प्रमाणात वाढ झालेली असुन त्यामध्ये शेतकरी बांधवाच्या इलेक्ट्रीक मोटारी, केबल, स्टार्टर आदींची चोरी होत असुन वेगवेगळ्या प्रकारच्या टु व्हीलर मोटार सायकलीही चोरी होत आहेत.
आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटनेत मोठी वाढ; पोलीसांचे दुर्लक्ष
राहुरीचा आठवडे बाजार गुरुवारी भरत असून या बाजारातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मोबाईल चोरी जाण्याच्या घटना घडत असून गुन्ह्यांची नोंद होऊनही पोलीस प्रशासन मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात व गुन्ह्यांना आळा घालण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. माहगडे मोबाईल असल्याने तालुक्यातील नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
राहुरी तालुक्यात छेडछाडी व रोड रोमिओंमुळे मुलींना पळवुन घेवुन जाण्याचे प्रमाणही वाढलेले असुन त्यामुळे संबंधीत मुलींच्या आई- वडीलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन मुलींना शाळा, कॉलेजमध्ये पाठवावे की नाही ? हा ही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेमध्ये वरील घटनेमुळे भितीचे वातावरण असुन याला सर्वस्वी राहुरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. गावोगावी चालु असलेल्या अवैध बेकायदेशीर दारु विक्रीमुळे गावोगावचे तरुण व्यसनाधीन झाल्यामुळे कुटुंबात वाद व कलह चालु आहे. राहुरी तालुक्यातील खेडोपाडी अवैध धंद्यांना उत आला आहे. तसेच राहुरी नगर -मनमाड रस्त्यावरील राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही हॉटेलवर अवैध वेश्या व्यवसाय व इतरही गैरमार्गाने अवैध धंदे व व्यवसाय चालु आहेत. इतकेच नव्हेतर राहुरी तालुक्यात मुळा व प्रवरा या दोन नद्या असुन त्यामध्ये देखील बेकायदेशीर वाळु तस्करी उत्खनन वाळु चोर करीत आहेत.
त्याचप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगर -मनमाड सारखा राज्य महामार्ग केलेला असुन सदरचा राज्य महामार्ग गेल्या कित्येक महिन्यापासुन खराब झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावर जे अपघाताच्या घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर ब-याच घटनेत राहुरी पोलीस प्रशासन अपघात व्यक्तीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून राहुरी पोलीस स्टेशनच्या बाहेरच तडजोड करण्याचे बेकायदेशीर काम करीत आहे. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या कोर्टाचे समन्स व वारंट बजावणीचे काम करतांना राहुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे संबंधीत व्यक्तींना आरेरावीची व दमबाजीची भाषा करतात. गेल्या काही दिवसांपासुन राहुरी तालुक्यात राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी कट्टे सारखे शस्त्र देखील सापडु लागले आहेत. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यात बेकायदेशीर सावकारकीचे धंदेही चालु आहेत. याला सर्वस्वी राहुरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे.
अशा प्रकारे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत कित्येक दिवसांपासुन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असुन राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. राहुरी पोलीस स्टेशनचा गुन्हेगारीवरला वचक कमी झालेला आहे. त्यामुळे वरील प्रमाणे घटना राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन वेळोवेळी घडत आहेत. अशा प्रकारे आमची राहुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात वरील प्रमाणे तक्रार असुन राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर दारु विक्री व अवैध धंदे हे जर वेळीच थांबले नाहीतर राहुरी पोलीस प्रशासनाच्या विरोधात लवकरच मोठं जन आंदोलन करणार आहे. त्यामुळे आमच्या वरील तक्रारीची सरकारने व वरीष्ठ अधिका-यांनी दखल घेवुन राहुरी पोलीस स्टेशन यांना योग्य ती कायदेशीर समज द्यावी व वरील राहुरी पोलीस स्टेशनचे हद्दीत चाललेल्या बेकायदेशीर धंद्यांची चौकशी करणेसाठी उच्चस्तरीय गुप्तचर विभागामार्फत चौकशी व्हावी व संबंधीत राहुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्यात यावी.
सदर निवेदनावर ॲड. भाऊसाहेब पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज जाधव, प्रतिक विधाते, ओंकार देशपांडे, गणेश उंडे, संदेश गायकवाड, राजेंद्र आडागळे, भाऊसाहेब उंडे, संतोष चोळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.