देवळाली प्रवरा येथील सामाजिक एकोप्याचा आदर्श देशाने घ्यावा – पांडूरंग महाराज वावीकर
चैतन्य उद्योग समूहाचे वतीने मुस्लिम पंच कमेटीचा सन्मान संपन्न
राहुरी | जावेद शेख : माणसाने कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माणसाच्या हातात नाही. मात्र, ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या त्या धर्माला वाढविण्यासाठी आपले आचार विचार शुद्ध सात्विक विचार ठेवावेत. एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला तर सर्व विश्वात लोक आनंदात जीवन जगतील असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा येथील नवनिर्वाचित मुस्लिम पंच कमेटीचा चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, अध्यक्ष गणेश भांड, बाबा महाराज मोरे, बाळासाहेब खांदे, नानासाहेब कदम, सुनील भांड, सुनील खांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वावीकर महाराज म्हणाले की, या विश्वामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणूसकी ही एकमेव जात आहे. देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक एकोपा हा एक आदर्श आहे. भांड कुटुंबीयांनी शहरातील मुस्लिम बांधवांचा आज माझ्या उपस्थित केलेला सन्मान शहरातील सामाजिक एकोपा वाढविण्याचे काम करेल.
चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरात सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने वास्तव करत आहेत. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. सध्याच्या काळात एकंदरीत परिस्थिती पाहता शहरातील सामाजिक एकोपा ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हिच परंपरा कायम ठेवणे हे आपले अद्यकर्तव्य माणून सर्वांनी काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.